जुहू पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लाख रुपयाच्या कोकेनसह एकाला जुहू पोलिसांच्या एटीसी विभागाने अटक केली. तो मूळचा नायजेरियाचा राहणारा असून सध्या मीरा रोड येथे वास्तव्यास होता.
ओकोरो जॉन ऑर्जी (३०), असे अटक नायजेरियनचे नाव आहे. तो मीरा रोडच्या मागा नाका येथे राहतो.
जुहू जिमखाना गेटजवळ ५ जुलै २०२१ रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे, एटीसीचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मेदगे आणि त्यांचे पथक गस्त घालत होते. यावेळी ऑर्जी हा त्याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेत अंगझडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे १४ ग्रॅम कोकेन सापडले. ज्याची किंमत १ लाख १२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार रात्री नऊच्या सुमारास त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने हे कोकेन कुठून आणले, तसेच तो ते कोणाला देणार होता याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली.