कस्टम अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक, विनोबा भावे नगर पोलिसांची कारवाई
विवाह संकेतस्थळावरून गंडविणाऱ्या नायजेरीयन दुकलीचा पर्दाफाश
कस्टम अधिकारी म्हणून कॉल करणाऱ्या महिलेला दिल्लीतून अटक; विनोबा भावेनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून ओळख करायची. कधी पायलट, तर कधी इंजिनिअर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. सावज जाळ्यात येताच परदेशातून महागड़े गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली बनावट कस्टम अधिकाऱ्याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन दुकलीचा विनोबा भावेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात, दिल्लीतून कस्टम अधिकारी असल्याचे सांगून कॉल करणाऱ्या जासिंटा ओवोकोनु ओफाना (२६) या महिलेला जेरबंद केले आहे, तर तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
कुर्ला परिसरात राहणाऱ्या महिलेला आरोपी डायबी अमारा ऊर्फ डॅनियल (३१) याने रशिया देशात पायलट असल्याचे सांगून संवाद साधला. पुढे याच मैत्रीतून तरुणीला यूकेमधून गिफ्ट पाठवित असल्याचे सांगितले. पुढेे हे गिफ्ट दिल्ली विमानतळावर येताच जासिंटाने कस्टम अधिकारी असल्याचे सांगून वेगवगेळ्या शुल्काच्या नावाखाली १७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे दिल्ली कनेक्शन समोर आले. त्यानुसार पथकाने दिल्लीतील टिळक नगर भागातून जासिंटाला अटक केली आहे.
जासिंटा ही नायजेरीयन असून, तिच्याकड़ून दोन पासपोर्ट मिळून आले. नायजेरीया, सिएरा, लिओनी देशांचे पासपोर्ट आहेत. यात नऊ मोबाइल, सहा भारतीय सीमकार्ड, विविध बँकांचे डेबिट कार्ड, डाटा कार्ड ताब्यात घेण्यात आले आहेत, तर डायबी अमारा ऊर्फ डॅनियल (३१) याचा शोध सुरू आहे. त्याच्या घरझडतीमध्ये दोन लॅपटॉप, सहा मोबाइल, तीन आंतरराष्ट्रीय सिम कार्ड, भारतीय सिम कार्ड, पासपोर्ट तसेच विविध बँकांचे डेबिट कार्ड, डाटा कार्ड मिळून आले आहेत. या दुकलीने मुंबईसह राज्यभरात अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पथकाला आहे, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.