नायजेरियन टोळी गजाआड

By Admin | Published: March 5, 2016 02:24 AM2016-03-05T02:24:49+5:302016-03-05T02:24:49+5:30

कर्करुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या बियांची (बेनव्हिला सीड्स) आॅनलाइन विक्री करण्याच्या बहाण्याने गरजू नागरिकांना गंडा घालणाऱ्या नवी मुंबईतील एका टोळीचा गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला

Nigerian gang fleece | नायजेरियन टोळी गजाआड

नायजेरियन टोळी गजाआड

googlenewsNext

मुंबई : कर्करुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या बियांची (बेनव्हिला सीड्स) आॅनलाइन विक्री करण्याच्या बहाण्याने गरजू नागरिकांना गंडा घालणाऱ्या नवी मुंबईतील एका टोळीचा गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मराठी तरुणीसह चौघा नायजेरियन तरुणांना अटक केली आहे. एका निवृत्त अधिकाऱ्याचीही तब्बल ७७ लाख ९५ हजार रुपयांना फसवणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे.
एलिझाबेथ फाळके उर्फ स्मिता शर्मा (२९), तिचा पती गुडविन चुनीकेम ओनिएनफोरो उर्फ चिकवूड (३६), ओकेजे व्हिल्यम्स उर्फ राजीव व्ही चॅट (३८, तिघे रा. खारघर), इमानियल पास्कल (२४, जुहूगाव, वाशी), लॅनसना सिस्से उर्फ नजीमोगू उर्फ चिडीबेंद्रे लकी उर्फ प्रिन्स (३३, कोपरखैरणे) अशी त्यांची नावे असून आणखी काही साथीदार फरार आहेत.
नवी मुंबईत विविध ठिकाणी छापा टाकून त्यांच्याकडून ३४ मोबाइल, १० पेनड्राइव्ह, ४ डोंगल, ४ हार्डडिस्क व १० किलो बियांची पावडर जप्त केली आहे. घरगुती मसाल्यासाठी वापरली जाणारी ही पावडर असून भेंडीबाजार परिसरातून विकत घेतली गेल्याचे सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश बागूल यांनी सांगितले.
आरसीएफ परिसरात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याला व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी इंटरनेटवर ६६६.२३ी१’्रल्लॅु्रङ्म२ू्रील्लूी.ूङ्मे या वेबसाइटवर कॅन्सर रुग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या बेनिव्हिला सीड्सच्या व्यवसायाची जाहिरात पाहिली. त्यांनी त्याबाबत संपर्क साधला असता त्यांना ठाण्यातील बोईसर येथील स्मिता एंटरप्रायझेस या कंपनीकडून खरेदी करून परदेशात विकल्यास मोठा नफा मिळविता येईल, असे सांगण्यात आले. स्मिता शर्मा त्यांना फोन करून त्याबाबत वारंवार माहिती देत असे, तिच्या सांगण्यावरून त्यांनी दोन महिन्यांत विविध १९ बॅँक खात्यांवर तब्बल ७७ लाख ९५ हजार रुपये जमा केले. मात्र त्यानंतर स्मिताने त्यांच्याशी काहीही संपर्क न ठेवता सर्व मोबाइल बंद केले.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर सेलशी संपर्क साधून तक्रार दिली. उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त अशोक जाधव, वरिष्ठ निरीक्षक नीलेश बागूल, निरीक्षक जितेंद्र मिसाळ आदीच्या पथकाने सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांना विविध ठिकाणांहून अटक केली असून त्यांच्याकडून अशाप्रकारे फसवणूक केल्याचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)

Web Title: Nigerian gang fleece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.