गंडा घालणारे नायजेरियन गजाआड

By admin | Published: December 12, 2015 02:08 AM2015-12-12T02:08:11+5:302015-12-12T02:08:11+5:30

लॉटरी, लकी ड्रॉ, नोकरीचे आमिष, बनावट वेबसाइटसह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याच्या नावाखाली मुंबईसह देश-विदेशातील

Nigerian Gaza Aad | गंडा घालणारे नायजेरियन गजाआड

गंडा घालणारे नायजेरियन गजाआड

Next

मुंबई : लॉटरी, लकी ड्रॉ, नोकरीचे आमिष, बनावट वेबसाइटसह वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविण्याच्या नावाखाली मुंबईसह देश-विदेशातील नागरिकांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीचा पर्दाफाश करण्यात कुलाबा पोलिसांना यश आले. या टोळीचा म्होरक्या किंग फ्ली पसार असून व्हॉट्सअ‍ॅपवरून या टोळीचा कारभार सुरू होता. या टोळीतील चार जणांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.
मायकेल इबेल (३८), उमू उचेना (३९), एमॅन्युअल ओकाफा (२४), अ‍ॅण्टोनी विसडॉक (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. एका शाळेतील फुटबॉल प्रशिक्षकाला बँकेतून बोलत असल्याचे सांगून या टोळीने त्यांचा पिन क्रमांक मिळविला. पिन क्रमांक मिळताच त्यांच्या खात्यातील ३० हजार रुपये काढण्यात आले. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित प्रशिक्षकाने कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण पाठारे यांच्या तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. याचा अधिक तपास करत असताना पाठारे यांच्या पथकाला नायजेरियन टोळीचा पर्दाफाश झाला.
नामांकित कंपनीच्या नावाने बनावट लॉटरी अथवा लकी ड्रॉ काढणे, बनावट वेबसाइट तयार करून त्यावर कमी किमतीत महागड्या गाड्या, वस्तूंसह मुली पुरविण्याचे आमिष दाखवल्यामुळे मुंबईकर त्यांच्या जाळ्यात अडकत होते. तर दुसरीकडे बँक खातेदारांचा डेटा गोळा करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा घेऊन खातेदारांची फसवणूक करत होते. एकदा सावज हाती लागले, तर या टोळीचा मुख्य सूत्रधार किंग फ्ली हा व्हॉट्सअ‍ॅपवरून पुढे काय करायचे, हे सांगत असे.
कॉल सेंटर, खासगी एजन्सीतील काही तरुण या रॅकेटच्या संपर्कात असल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यांच्या मदतीने या टोळीचा म्होरक्या किंग फ्ली नागरिकांना गंडा घालत असल्याचे समजले. आतापर्यंत शेकडो मुंबईकरांना या टोळीने गंडा घातल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nigerian Gaza Aad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.