मुंबई : दिल्लीहून मुंबईत तस्करीसाठी आणलेले ५ कोटी ३६ लाख किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.चेंबूर परिसरात एक नायजेरियन ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास चेंबूर शिवडी रोड परिसरात पथकाने सापळा रचून नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्या प्लास्टिक बॅगची तपासणी केली असता महिलांच्या ५ पर्स आढळल्या. त्या पर्समध्ये ४ कोटी ९६ लाख ५० हजार किमतीचा ९६५ ग्रॅम एमडी आणि ३९ लाख ६० हजार रुपये किमतीचे १९८ ग्रॅम कोकेन मिळून आले. आरोपीकडे केलेल्या चौकशीत हे ड्रग्ज त्याने दिल्लीहून आणल्याचे समोर आले. त्यानुसार वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसात गुन्हे शाखेची अमलीपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहिम सुरू असून मुंबई तसेच भाईंदर परिसरातील काही संशयित नायजेरियन नागरिकांची शोधमोहिम सुरू असून चेंबूर शिवडी रोड येथील कारवाई त्याचाच भाग आहे.
दिल्लीहून आणलेले पाच कोटींचे ड्रग्ज जप्त, नायजेरियन नागरिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 6:39 AM