फसवणूक करणाऱ्या नायजेरियन चौकडीला अटक
By admin | Published: June 17, 2014 01:51 AM2014-06-17T01:51:36+5:302014-06-17T01:51:36+5:30
ओएलएक्स, क्वीकर यासारख्या वेबसाईटवर कार विकण्याबाबतच्या जाहिराती करुन कार खरेदी करण्यासाठी इच्छुक लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या नायजेरियन टोळीतील चार आरोपींना अटक
पनवेल : ओएलएक्स, क्वीकर यासारख्या वेबसाईटवर कार विकण्याबाबतच्या जाहिराती करुन कार खरेदी करण्यासाठी इच्छुक लोकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या नायजेरियन टोळीतील चार आरोपींना अटक करण्याची कारवाई नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. या टोळीमध्ये एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाचा समावेश असून या टोळीकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, १५ मोबाइल, ११ वेगवेगळ्या कंपन्यांचे सीमकार्ड आदी साहित्य जप्त केले आहे. या टोळीने मुंबई, ठाणे, पुण्यासह देशातील इतर राज्यांतील नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खारघर सेक्टर-३५ भागात नायजेरियन नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील बाजारे सहाय्यक आणि त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर-३५ मधील साई हिरा पार्क सोसायटीत छापा मारुन बेन नुवॉचिकू बेनार्ड (३२) या नायजेरियन नागरिकासह फॅन्क झेप झुमा (३४) या दक्षिण आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांजवळ पासपोर्ट तसेच व्हिजाबाबतची माहिती घेतली असता ते भारतात पासपोर्ट व व्हिजाशिवाय राहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याजवळ असलेले दोन लॅपटॉप, १५ मोबाइल फोन, ११ वेगवेगळ्या कंपन्यांचे सीमकार्ड आदी साहित्य जप्त केले.
गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीतील कारा इमेका पीटर (२६) या नायजेरियन नागरिकासह तामिळनाडू राज्यात राहणारा रेवीन राजकुमार नाडार (१९) या दोघांना अटक केली. ही टोळी वेबसाईटवर कार विकण्याबाबतच्या जाहिराती देऊन कार खरेदी करण्यासाठी इच्छुक लोकांना आपला ई-मेल आयडी देत. त्यानंतर ही टोळी बँकेतील खाते क्रमांक देऊन त्यात रक्कम जमा करण्यास सांगत आणि फसवणूक करीत होते.