नायजेरियन तस्करांचा पोलिसांवर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:23 AM2018-12-16T07:23:27+5:302018-12-16T07:23:45+5:30
भायखळा परिसरात थरारनाट्य : सात जणांना अटक, तीन साथीदार फरार
मुंबई : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर नायजेरियन तरुणांच्या टोळीने गोळीबार करून प्रतिकार केल्याची घटना भायखळ्यातील निर्मल पार्क परिसरात शनिवारी पहाटे घडली. या वेळी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या थरारनाट्यात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी सात तस्करांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, हत्यारे व अमली पदार्थ जप्त केले.
क्रिस्ट इगीली डायला (वय २५), डॅन ओकोफर ओकोनोको (२५), चुकूस असीगबो (२७), चुकूवायजीक गॅडफ्रीअॅनीअमवू (४१), ज्युल इडायचे (४०), नॅन्यामडी आॅगस्टीन ओकोरो (३८), व जॉन वॉगबुरी (२२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४१ हजारांच्या रोकडीसह २१ लाखांचे अमली पदार्थ व रिव्हॉल्वर, ३ जिवंत काडतुसे, चाकू व ११ मोबाइल जप्त केले आहेत. सर्व जण नायजेरियन असून गेल्या काही महिन्यांपासून ते परिसरात अमली पदार्थाची तस्करी करीत होते.
पलायन करणाºया तस्करांचा पाठलाग करताना रेल्वे स्थानकाजवळील लोखंडी रेलिंग लागल्याने चार पोलीस जखमी झाले. तर पाठलागामध्ये तिघे नायजेरियनही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश कदम यांच्या नेतृत्वाखाली २१ जणांचे पथक शुक्रवारी रात्री बिट क्रमांक एकच्या हद्दीत ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करीत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील निर्मल पार्क परिसरात पहाटे चारच्या सुमारास ८-१० नायजेरियन तरुणांचा गट दिसून आला. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने आपल्याकडील रिव्हॉल्वरने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनीही सावध होत
त्यांच्या दिशेने दोन वेळा गोळीबार केला.
शिताफीने दोघा तरुणांना पकडले. पोलिसांची संख्या व ते शस्त्रानिशी आल्याचे लक्षात आल्याने इतरांनी लोखंडी रेलिंगवर चढून चिंचपोकळी स्थानकाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनीही शिताफीने रेलिंगवर चढून त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले. या झटापटीत चौघा पोलिसांना लोखंडी रेलिंग लागले. सात जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांचे तिघे साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पर्यटन, शिक्षणाच्या व्हिसावर आले भारतात
अटक केलेल्या तस्करांकडून ५५० ग्रॅम एम.डी. पावडर, ११० ग्रॅम ब्राउन शुगर, ११ ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याची किंमत २१ लाख रुपये आहे. याशिवाय पाइंट ३२ बोअरची परदेशी बनावटीची रिव्हॉल्वर, ३ जिवंत काडतुसे, एक चाकू, अकरा मोबाइलही पोलिसांनी जप्त केले. अटक नायजेरियन तरुण पर्यटन, शिक्षणाच्या व्हिसावर भारतात आले. मात्र, ते अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवितात. त्यापैकी अनेकांच्या व्हिसाची मुदत संपली असून, त्याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश कदम यांनी सांगितले.