निघाली मान्सून एक्स्प्रेस; पुढील स्थानक मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:07 AM2021-06-09T04:07:44+5:302021-06-09T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व सरींची तुरळक ठिकाणी दमदार हजेरी लागत असतानाच दुसरीकडे अलिबाग, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व सरींची तुरळक ठिकाणी दमदार हजेरी लागत असतानाच दुसरीकडे अलिबाग, रायगडमध्ये मुक्कामी असलेली मान्सून एक्स्प्रेस आता मुंबईच्या दिशेने सुसाट निघाली असून, येत्या २४ तासांत ती येथे दाखल होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्य:स्थितीमध्ये मुंबईत सर्वदूर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाले आहे. येत्या २४ तासांत मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होईल, असे संकेत प्राप्त होत आहेत. शिवाय येत्या काही दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या बहुतांश भागांत, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, तर कोकण, गोव्याच्या तुरळक भागांत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
आज येथे लावणार हजेरी
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी बुधवार ९ जून राेजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
.............................