पश्चिम द्रुतगती मार्गावर रात्रकालीन ब्लॉक; वाहतूक वळवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 05:03 AM2019-06-22T05:03:53+5:302019-06-22T05:04:14+5:30

आजपासून दोन दिवस उड्डाणपुलाचे काम

Night block on West Expressway; To divert traffic | पश्चिम द्रुतगती मार्गावर रात्रकालीन ब्लॉक; वाहतूक वळवणार

पश्चिम द्रुतगती मार्गावर रात्रकालीन ब्लॉक; वाहतूक वळवणार

Next

मुंबई : बांद्रा पूर्व येथील पादचारी पुलाचा काही भाग सी-लिंक ते बीकेसी उड्डाणपुलाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तोडण्यात येणार आहे. या कामासाठी पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री तोडणार असल्याचे प्राधिकरणाने सांगितले. मात्र, वाहतूक वळवण्यात येणार असल्याने, प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

पादचारी पुलाची दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी रात्री ११ वाजता ते रविवारी सकाळी ५ वाजेपर्यंत, तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत तोडण्यात येणार आहे. या दरम्यान, पश्चिम द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी प्राधिकरणाला मिळाल्याने प्राधिकरणाने हे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.

या कामासाठी प्राधिकरणातर्फे सुमारे चार कोटी रुपये खर्च होणार आहे. ७१४ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर, २०१९ मध्ये पूर्ण झाल्यावर, या पादचारी पुलाच्या दोन्ही मार्गिका पुन्हा नव्याने बांधण्यात येतील.

यापूर्वीच हे काम प्राधिकरणाकडून करण्यात येणार होते. मात्र, या कामासाठी आवश्यक असलेली वाहतूक पोलिसांची परवानगी मिळत नसल्याने हे काम रखडले होते. आता वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्याने कामास सुरुवात करण्यात येईल. एमएमआरडीएला पादचारी पुलाच्या कामांतर्गत क्रेनचा वापर करून, काही भाग कापून काढावा लागणार आहे. त्यासाठीच दोन वेळा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे.

Web Title: Night block on West Expressway; To divert traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.