रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेलचालक संतापले; व्यवसायावर गदा, ‘थर्टी फर्स्ट’ आयोजनावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 02:35 AM2020-12-23T02:35:40+5:302020-12-23T07:11:29+5:30

night curfew : पुण्यात हॉटेल असोसिएशनचे तीन हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे.

The night curfew angered hoteliers; The hammer on the business, the ‘Thirty First’ event | रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेलचालक संतापले; व्यवसायावर गदा, ‘थर्टी फर्स्ट’ आयोजनावर विरजण

रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेलचालक संतापले; व्यवसायावर गदा, ‘थर्टी फर्स्ट’ आयोजनावर विरजण

Next

मुंबई/पुणे : रात्री अकरा ते पहाटे सहादरम्यान संचारबंदी लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. कोरोना टाळेबंदीनंतर आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा सरकारने आमच्या व्यवसायावर संक्रांत आणली, अशीच सर्वांची भावना असून कोरोना विषाणू काय रात्रीचाच फिरतो का, असा त्रस्त सवाल हॉटेल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुण्यात हॉटेल असोसिएशनचे तीन हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे. संघटनांच्या वतीने ही नाराजी सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ऐन नाताळाच्या काळातच ही बंदी आल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. सलग सहा महिन्यांच्या बंदीनंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर मागील महिनाभरात व्यवसाय सुरळीत होत होता. नाताळात चांगला व्यवसाय होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र आता सरकारच्या निर्णयाने त्यावरही पाणी पडले असल्याचे हॉटेलचालक बोलून दाखवत आहेत.
सध्या त्यांना रात्री साडेअकरापर्यंत परवानगी असली तरी साडेदहा वाजल्यापासूनच त्यांना आवराआवर करावी लागत होती. हीच वेळ रात्री १२पर्य़ंत वाढवण्याची हॉटेल व्यावसायिकांची मागणी होती. ते तर झालेच नाही, उलट ११ नंतर संचारबंदी आणली गेली. त्यामुळे आता दहा वाजल्यापासूनच आवरते घ्यावे लागणार आहे. 


मुंबईत गर्दी नियंत्रणाची हॉटेल मालकांची तयारी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक हॉटेलमध्ये येत असतात. निर्बंध असतील तर ते येणार नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत येईल, असे आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. शिवानंद शेट्टी म्हणाले की, आम्‍ही युकेमध्‍ये आढळून आलेल्‍या नवीन प्रकारच्‍या कोरोनाविषाणूच्‍या उद्रेकाबाबत महामारीशी सामना करणाऱ्या राज्‍य सरकारसोबत आहोत. ७ महिन्‍यांच्‍या लॉकडाऊननंतर आम्‍ही सर्व एसओपींचे पालन करत स्थिती सुरळीत होण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्‍या सदस्‍यांना एसओपींचे काटेकोरपणे पालन करण्‍याचे सांगितले आहे. पण अधिक कडक उपाययोजना केल्‍यास उद्योगक्षेत्र तीव्र संकटात सापडू शकते. ऑक्‍टोबरमध्ये निर्बंध शिथिल केल्‍यानंतर देखील अनेक रेस्‍टॉरंट्स सुरू झालेली नाहीत. यामधून ते कायमस्‍वरूपी बंद झाल्‍याचे दिसून येते. आम्‍ही सरकारला कामकाजाचे तास वाढवण्‍याची विनंती करतो, ज्‍यामुळे रेस्‍टॉरंट व बार मालकांना गर्दीवर उत्तम पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासोबत व्‍यवस्‍थापन करता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

सरकारचा निर्णय अनाकलनीय आहे. त्याविरोधात आम्ही दाद मागत आहोत. रात्री १२ पर्यंतच्या परवानगीची आमची मागणी सोडून सरकारने हा असा निर्णय घेतल्याने पुन्हा आमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. 
    - गणेश शेट्टी, 
    अध्यक्ष, पुणे हॉटेल असोसिएशन

Web Title: The night curfew angered hoteliers; The hammer on the business, the ‘Thirty First’ event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.