'नाईट कर्फ्यू'वर हॉटेल व्यावसायिक नाराज, थेट शरद पवारांची भेट घेणार
By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 12:27 PM2020-12-22T12:27:54+5:302020-12-22T12:30:17+5:30
हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.
मुंबई
ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने घातलेल्या धुमाकुळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाइट कर्फ्यू) लागू केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हॉटेल व्यावसायिकांचे शिष्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी केली आहे.
राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंत राज्यात महापालिका क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. पण हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल सुरू ठेवण्याची रात्री ११ ची वेळ वाढवून ती दीड वाजेपर्यंत करावी, अशी मागणी केली आहे.
लॉकडाऊनमुळे याआधीच हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी व्यवसायाचा काळ असतो. याकाळात हॉटेल्स लवकर बंद ठेवले तर मोठं नुकसान होईल, असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे.