रात्र वैऱ्याची आहे!
By admin | Published: February 20, 2017 07:08 AM2017-02-20T07:08:24+5:302017-02-20T07:08:24+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी
चेतन ननावरे / मुंबई
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजल्यानंतर थंडावल्या. मात्र त्यानंतर उमेदवारांनी छुप्या प्रचाराला सुरुवात केली असून, सोमवारच्या रात्री ‘होत्याचे नव्हते’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष सोमवारच्या रात्रीचा दिवस करून मतदारसंघात लक्ष घालून राहणार आहे.
तिकीटवाटपावेळी सर्वपक्षीयांमध्ये नाराजीचे सूर उघडपणे उमटले होते. त्याचाच फायदा घेण्यासाठी शेवटच्या दिवशी पैसे, मद्य आणि पदांची लालूच दाखवून दुखावलेल्यांना आपल्या गोटात ओढण्याचा अंतिम प्रयत्न केला जाईल. त्यात शक्तिप्रयोगाचा वापरही नाकारता येणार नाही. म्हणूनच गेल्या दोन दिवसांत साड्या, पैसे आणि मद्यवाटपाचे विविध प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाची करडी नजर या प्रकारांवर असेल. तरीही गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, दीपोत्सव मंडळ अशा विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा मंडळांच्या गाठीभेटींना सुरुवात झालेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या बाजूने नेमका कोण आहे, याचा अंदाज घेतल्यानंतरच उमेदवार पैशांची पाकिटे पुरवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोमवार व मंगळवारी ‘ड्राय डे’ असल्याने बहुतेक उमेदवारांनी मद्याचा साठा रविवारीच करून ठेवला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी या साठ्याचे वितरण होणार असल्याचे एका राजकीय पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितले. प्रत्येक मंडळ आणि सोसायटी कोणत्या पक्षासोबत संपर्कात आहे, याचा कानोसाही उमेदवार घेत आहेत. त्यात जे ग्रुप किंवा मंडळ खरेच आपल्या फेव्हरमध्ये आहे, त्यांनाच पाकिटे देण्यात येत आहेत. तर ज्यांना पाकिटे द्यायची नाहीत, त्यांना थेट नकार न देता निकालानंतर ठरावीक रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले उमेदवार पक्षावर राग व्यक्त करण्यासाठी अन्य पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत सामील झाल्याचे चित्र घाटकोपरच्या काही प्रभागांत रविवारी पाहायला मिळाले. तिकीटवाटप होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही संबंधित पक्षांना नाराज झालेल्या उमेदवारांची नाराजी दूर करता आली नाही. ऐन वॉर्डच्या प्रभाग क्रमांक १२६मध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते मनसे उमेदवाराच्या प्रचारात दिसले. त्यांच्या प्रचारसभांमध्ये व पदयात्रांमध्ये या दोन्ही नाराज उमेदवारांनी भाग घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
एकदा तरी पार्टी दे!
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या उघड प्रचाराला रविवारी सायंकाळी फुलस्टॉप लागला असला, तरी सायंकाळनंतर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते विभागात चारचाकी आणि दुचाकी वाहनांतून फिरत होते. सोमवार आणि मंगळवार या दोन दिनी मांसाहार करता येत नसल्याने बहुतेक कार्यकर्त्यांनी रविवारी रात्रीच पार्टीचा बेत केला होता. त्यामुळे रविवारी झालेल्या प्रचाराच्या धुरळ्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण तापले होते.
प्रेमासोबत दमदाटीही..!
रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवारांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी सुरू आहे. ज्या इमारत किंवा चाळीतील मतदार प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या बाजूने असतील, त्यांना गाठण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे संबंधित इमारत किंवा चाळीतील पदाधिकाऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊन प्रेमाने प्रसंगी खडसावून मते मागण्याच्या प्रकाराला रविवारी सुरुवात झाली.
टेहळणीला
सुरुवात
प्रचारात दंग असल्याने मतदारांच्या गाठीभेटी घेताना त्यांच्याशी यथायोग्य संपर्क उमेदवारांना साधता आला नाही. त्यामुळे प्रचारबंदी असताना, दोन दिवस गाडीतून फिरून उमेदवार मतदारसंघाची टेहळणी करताना दिसतील. या वेळी एखाद्या मतदाराला थेट उमेदवाराला काही सांगायचे आहे का? याचाही आढावा घेतला जाईल.
मिळेल ते ओरबाड..!
गेल्या महिन्याभरात बहुतेक प्रभागांत तरुणांपासून प्रौढ मतदारांचे नवनवे ग्रुप तयार झाले आहेत. प्रस्थापित पक्षांसोबत अपक्षांकडून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न या ग्रुपकडून होत आहे. काही ग्रुपने रविवारी रेसॉर्ट आणि पार्टीची व्यवस्थाही करून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही मते नेमकी कुणाला मिळणार? हे तर मतदानाच्या निकालानंतरच समोर येईल. मात्र सध्यातरी उमेदवारांकडून पाण्याप्रमाणे पैसा ओतला जात असल्याने ‘मिळेल ते ओरबाडून घ्या’ हीच मानसिकता दिसत आहे.