मुंबई : मुंबईमध्ये नाईट लाईफसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिन म्हणजेच येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वच्छता सर्वेशा कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. सुरुवातीला काळा घोडा, बी के सी, नरीमन पॉइंट येथे परवानगी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हॉटेल, मॉल्स, दुकाने 24 तास सुरू राहणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.
याबाबत 2017 मध्ये निर्णय घेण्यात आला होता. आता याची अधिसूचना काढण्यात येणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.
केंद्रीय मंत्रीमंडळाने 'मॉडेल शॉप्स अँड एस्टाब्लिशमेंट्स' ( दुकाने आणि आस्थापना) कायद्याला मंजुरी दिल्याने आता देशभरातील विविध शहरातील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहू शकणार आहेत. या कायद्यामुळे दिवसा काबाडकष्ट करणा-या सर्वसामान्य मुंबईकरांना नाईट लाइफ अनुभवता येऊ शकते. कारण उच्चभ्रूंसाठी नाइटलाइफ नवीन नाही, त्यांचा दिवस रात्रीच सुरु होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्री हॉटेल्स, दुकाने चालू ठेवण्याची मागणी केली होती. ही मंजुरी जुलै 2016 मध्येच देण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांतील सरकारला दिलेल्या निवेदनात हॉटेल व रेस्टॉरन्ट २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी संघटनेने मागितली होती.
नाइट लाइफला गृहविभागाचा तीव्र विरोध
दरम्यान, आदित्य यांच्या घोषणेनंतर भाजपाने नाईट लाईफला विरोध केला आहे. राज्य सरकार जर निवासी भागातील हाँटेल, पब सुरु ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल, असे आज भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत भूमिका मांडताना भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, मुंबईत हाँटेल, बार, पब 24×7 सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हाँटेल,पब 24×7 सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा कडाडून विरोध राहिल.कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांची सुरक्षितता याचा विचार होणे अपेक्षित असून या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार असून या निर्णयामुळे असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असेही आमदार अँड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.