मुंबईची ‘लाइफलाइन’ ठप्प झाल्याने जागलेली रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:10 AM2019-07-03T05:10:35+5:302019-07-03T05:13:01+5:30
पावसाने लोकल सेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना जागेवर थांबून राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
- जमीर काझी
मुंबई : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. महानगरातील माझ्या एका तपाच्या काळातील वास्तव्यात लोकल सेवेचा पहिल्यांदाच असा भीषण अनुभव प्रत्ययास आला. रस्त्यावरील वाहतूकही ठप्प असल्याने लोकलच्या ठिकाणी थांबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गर्दीमुळे दादर स्थानक पूर्ण रात्रभर गजबजून राहिलेले होते. रात्री सव्वा बारा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत संततधार पावसात दादर रेल्वे स्थानक, फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील लोकल आणि दादर टी टी पर्यंतच्या परिसरात येरझाऱ्या घालण्यात व्यतित केला. माझ्यासारखाच अनुभव कार्यालयातील सहकारी व अनेकांना घ्यावा लागला.
पावसाने लोकल सेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना जागेवर थांबून राहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. प्रवाशांना तब्बल ५-६ तासांहून अधिक काळ तिष्टत राहावे लागले. अनेकांनी हा काळ जागून काढला तर दिवसभराच्या श्रमामुळे थकलेले बहुतांश जण फ्लॅटफॉर्म आणि लोकलच्या सीट व पॅसेजच्या मोकळ्या जागेत मिळेल तेवढ्या जागेवर ताणून देत होते.
मी १२ वाजता नाइटची ड्युटी संपवून टॅक्सीने वरळीतून काही सहकाऱ्यांसमवेत लोअर परळ स्टेशनवर पोहोचलो. मध्य रेल्वेची सेवा बंद असल्याने तेथून पश्चिम रेल्वेने दादर स्थानकाकडे जात असताना ‘दादर व प्रभादेवी स्थानकाच्या मार्गावर तब्बल तीन लोकल थांबून असल्याचे आढळून आले. दादरला पोहोचल्यानंतर धावतच मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकाच्या फ्लॅटफॉर्म क्र. एकवर पोहोचलो. थोड्या वेळात पाण्याचा निचरा झाल्यानंतर लोकल सुरू होईल, असा अंदाज होता. रेल्वेकडून वारंवार तशा उद्घोषणा केल्या जात होत्या. मात्र जसजसा पावसाचा जोर वाढत गेला, तसतशी ती शक्यता धूसर होत गेली. लोकलमध्ये असलेले प्रवासी जवळपास पाऊण तास थांबून असल्याचे सांगत होते.
पावसाचा जोर कमी होत नसल्याने पुन्हा लोकल सुरू होण्याची शक्यता नसल्याने अनेक जण टॅक्सी, ओला-उबेर पकडून निघून जाऊ, या आशेने स्थानकाबाहेर निघून जात होते. सुरुवातीला काहींना वाहने मिळाली; मात्र पावसाचा जोर वाढू लागल्याने स्थानकाबाहेरील टॅक्सी चालकही भाडे न घेताच तसेच निघून जाऊ लागले. ओला, उबेरही उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे दादर-पुणे मार्गावर जाणाºया सुमो, तवेरा चालक आपसुक आलेल्या या संधीचा फायदा उठवित पनवेल, बेलापूरपर्यंत सोडण्यासाठी सातशे, आठशे रुपये भाडे सांगू लागले.
जसजशी वेळ वाढू लागली तसतसे त्यांचे दरही वाढू लागले. त्यामुळे पुन्हा दादर स्थानकाकडे परतण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तोपर्यंत रेल्वेच्या निवेदकांनी लोकल सेवा अनिश्चित काळासाठी रद्द केली असल्याचे जाहीर केले. त्यामुळे लोकलमध्ये बसून असलेल्या आणि स्थानकावर भटकत असलेल्या प्रवाशांनी सकाळशिवाय रेल्वे सुरू होणार नाही, अशी मानसिकता बनवून घेतली. त्यामुळे मोबाइलवरून घरच्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. थोड्या वेळाने पावसाची रिपरिप थांबल्यानंतर लोकल सुरू होईल, अशी आशा वाटत होती. मात्र रुळावर साचलेले पाणी ओसरले नसल्याने ते शक्यच नव्हते. त्यामुळे त्रासलेल्या, पेंगुळलेल्या नजरांनी एकमेकांना धीर देत दिवस उजाडण्याची प्रतीक्षा ते करू लागले होते.
पाऊस कमी न झाल्याने अनेकांनी स्थानकाबाहेर पडून रस्त्यावरील वाहतुकीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. पाच वाजल्यानंतर बेस्टच्या बसेस सुरू झाल्या. दादर टीटी येथे थोड्या प्रतीक्षेनंतर मला सानपाड्याला जाणारी ५०६ नंबरची बस मिळाल्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. भिजलेले कपडे आणि झोपेविना त्रासलेला चेहरा पाहून माझ्यावर उद्भविलेल्या परिस्थितीचा अंदाज कंडक्टरलाही आला. त्यामुळे तिकीट घेण्यासाठी घाई न करता पहिल्यांदा शांतपणे बसा, असा त्याने आपुलकीने सांगितले.