Join us

रात्रीच्या पावसाची मुंबईत तुफान बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:10 AM

मुंबई : मंगळवारी दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र मुंबईकरांना गाठलेच. रात्री आठच्या सुमारास मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ...

मुंबई : मंगळवारी दिवसभर लपंडाव खेळणाऱ्या पावसाने रात्री मात्र मुंबईकरांना गाठलेच. रात्री आठच्या सुमारास मुंबईत बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने काही क्षण का होईना मुंबईकरांना धडकी भरविली. आज, बुधवारी देखील मुंबईत पावसाचा मारा असाच कायम राहणार असून, ९ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.

मंगळवारी पहाटे पावसाने किंचित हजेरी लावली. सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत अधून मधून पावसाची हजेरी लावत होता, काही ठिकाणी ऊनदेखील कानोसा घेत होते. दुपारी दोनच्या सुमारास काही अंशी संमिश्र हवामान असताना, संध्याकाळी पुन्हा मुंबईवर पावसाचे ढग दाटून आले; पण पावसाचा काही पत्ता नव्हता. रात्री मात्र पावसाने चांगलाच काळोख केला. सात वाजता किंचित सुरू झालेल्या पावसाने आठ वाजता मात्र आपला जोर वाढविला. साडेआठनंतर यात आणखी भर पडली. नऊ वाजेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस अक्षरश: कोसळला. काही ठिकाणी विजांचा कडकडाटदेखील सुरू होता.

पावसाने मुंबईला लागला ब्रेक

धो धो कोसळत असलेल्या पावसाचे पाणी वेगाने मुंबईच्या रस्त्यांवरून वाहत होते. पावसाचा मारा प्रचंड असल्याने पाण्याच्या लोंढ्याचा वेग वाढतच होता. रात्री आठपासून पावसाचा वेग वाढल्याने मुंबईला किंचित ब्रेक लागला. रस्त्यांवर वाहनांऐवजी पाऊस धावू लागला. वाहनांचा वेग कमी झाला. काही अंशी का होईना रस्ते रिकामे झाले. रात्रीचे दहा वाजत आले तरीदेखील मुंबईत सुरू झालेला पावसाचा मारा कायम असल्याचे चित्र होते.