Join us

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना सतावतोय उदरनिर्वाहाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:28 PM

रेशनिंग सुविधा या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याची सरकरला विनंती

मुंबई : गरीबी वा अज्ञानामुळे जे तरुण शिक्षण प्रवाहातून बाहेर पडले किंवा घरगुती अडचणीमुळे दिवसाच्या शाळेत जाऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रात्रशाळा या हक्काचे व्यासपीठ ठरतात. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या मोठ्या नोकऱ्या अडचणीत आलेल्या असताना या रात्रशाळेतील विद्यार्थ्यंसमोरही पोटापाण्याचा प्रश्न नव्याने उभा राहिला आहे. रात्रशाळेतील हे विद्यार्थी पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काम करून , रात्री शिक्षणाचा पर्यायी मार्ग स्वीकारतात. मात्र आता अशा परिस्थितीत जिथे पुन्हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तिथे  ते पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देऊन सरकारने रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी रेशनिंगची सोय उपलब्ध  करून देण्याची मागणी होत आहे.रात्रशाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अत्यंत मेहनतीने आपले शिक्षण पूर्ण करत असतात. बहुतेक विद्यार्थी हे वंचित व दुर्बल घटकांतील आहेत.काही विद्यार्थ्यांवर तर संपूर्ण घराची जबाबदारी असते. काही मुले आपल्या नातेवाईकांच्या बरोबर राहतात आणि दिवसा पेपर लाईन टाकणे , हॉटेलमध्ये कपडा मारणे, अशी मजुरी व कष्टाची कामे करतात. लॉकडाऊनमुळे सध्या या सगळ्या गोष्टी असल्याने त्यांच्याही हाताला काम नाही. त्यामुळे साहजिकच त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघाचे मुंबई अध्यक्ष म्हात्रे यांनी दिली.गरिबीच्या पार्श्वभूमीमुळे काही विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्टफोन ही नाही त्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षणाचाही वापर करून घेता  नाही. कोरोनामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे यांचे सध्या शैक्षणिक नुकसान सुरूच आहे. मात्र शाळा  झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांना  अडचणींचा सामना  करावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. किमान या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी त्यांना रेशनिंगचे धान्य देण्यात  विनंती म्हात्रे यांच्याकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे.

 

टॅग्स :शाळाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस