Join us

बेस्ट सेवेसाठी आलेल्या एसटी चालक-वाहकांची रात्र डासांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:06 AM

विश्रांतीच्या ठिकाणी सोयीसुविधांची वानवालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत बेस्ट सेवेसाठी आलेल्या मराठवाड्यातील एसटी चालक-वाहकांची विश्रांतीची व्यवस्था कांदिवली ...

विश्रांतीच्या ठिकाणी सोयीसुविधांची वानवा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत बेस्ट सेवेसाठी आलेल्या मराठवाड्यातील एसटी चालक-वाहकांची विश्रांतीची व्यवस्था कांदिवली पश्चिम येथे करण्यात आली असली तरी तेथे सोयीसुविधांची वानवा आहे, त्यामुळे बेस्ट सेवेसाठी आलेल्या एसटीच्या चालक-वाहकांना रात्र डासांसोबत काढावी लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईतील वाहतुकीसाठी बस दिल्या आहेत. त्यासाठी राज्यातील विविध भागांतून एसटीचे कर्मचारी येत आहेत. त्यांची निवास आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येते. कांदिवली येथे ३० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी पंखा नाही, एसी असला तरी ताे बंद करून ठेवण्यात आला आहे. पिण्याचे पाणी चांगले नाही. हॉटेल रूममध्ये कचरा साचला आहे, साफसफाई होत नाही. तसेच डास मोठ्या प्रमाणात चावत असल्याने झोप लागत नाही, अशी नाराजी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

एका रूममध्ये दोन कर्मचाऱ्यांची व्यवस्था करायला हवी, मात्र चार कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोयीसुविधांच्या अभावामुळे १८ कर्मचारी नेन्सी डेपो येथे राहण्यासाठी गेले आहेत.

* सांगा विश्रांती मिळणार कशी?

रात्रीच्या वेळी प्रवास केल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था असावी. कांदिवली येथे निवासाची व्यवस्था केली असली तरी तेथे डासांचा त्रास आहे, अस्वच्छतादेखील आहे. पंखा नाही. त्यामुळे रात्रभर झोप लागत नाही.

- एक वाहक

* अद्याप काेणाकडूनही तक्रार आलेली नाही

बेस्ट सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांच्या कमतरतेबाबत कर्मचाऱ्यांकडून कोणतीही तक्रार आली नाही. सोयीसुविधा देण्याबाबत संबंधितांना सांगण्यात येईल.

- शेखर चन्ने,

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,

एसटी महामंडळ.

........................................