Join us

रात्रशाळा शिक्षकांना अजूनही पूर्ण वेतनाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 4:26 AM

फक्त रात्रशाळेतच काम करणा-या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा मिळूनही अद्याप वेतनश्रेणी मिळत नसल्याचे शिक्षक परिषदेने उघडकीस आणले आहे.

मुंबई : फक्त रात्रशाळेतच काम करणा-या शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा मिळूनही अद्याप वेतनश्रेणी मिळत नसल्याचे शिक्षक परिषदेने उघडकीस आणले आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मागणी करूनही कार्यवाही शून्य असल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.बोरनारे म्हणाले की, संबंधित रात्रशाळा शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांची वेतनश्रेणी तातडीने लागू करण्याची मागणी शिक्षण सचिवांकडे केली आहे. याबाबत शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना पत्र लिहून रात्रशाळा शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. राज्यात ५९८ तर मुंबईत २९१ शिक्षक रात्रशाळेत शिकवतात. १७ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार फक्त रात्रशाळेत शिकविणाºया शिक्षकांना प्रशासनाने नियमित केले आहे. मात्र पूर्णवेळेचा दर्जा न दिल्यामुळे हे सर्व शिक्षक नियमित पूर्णवेळ वेतनश्रेणी तसेच इतर सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत अनेकदा शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रात्रशाळा शिक्षकांमध्ये शिक्षण विभागाच्या विरोधात असंतोष आहे.सहा महिने उलटून गेल्यावरही पूर्णवेळ वेतनश्रेणी, पेन्शन योजना लागू करण्याबाबत शिक्षण विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. याबाबत शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन रात्रशाळा शिक्षकांना पूर्णवेळ शिक्षकांचा दर्जा देत नियमित वेतनश्रेणी द्यावी, अन्यथा शासनाच्या शिक्षकविरोधी भूमिकेविरोधात आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे.

टॅग्स :शिक्षक