मध्य रेल्वेवर रात्रकालीन ‘गर्डर ब्लॉक’, गाड्या १५-२० मिनिटांनी उशिराने धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:49 AM2018-03-31T05:49:25+5:302018-03-31T05:49:25+5:30
भांडुप स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.
मुंबई : भांडुप स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. भांडुप अप आणि डाऊन जलद मार्गावर ३१ मार्च रोजी रात्री साडेपाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर तीन तासांचा आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
भांडुप स्थानकावर जलद मार्गावरील रुळांवरून पादचारी पुलाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी देत कामाला सुरुवात केली. पादचारी पुलाच्या गर्डरसाठी मध्य रेल्वेने शनिवारी रात्री १२ वाजून १० मिनिटे ते रविवार पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे ठाणे स्थानकातून अप जलद मार्गावरील लोकल अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डाऊन मेल-एक्स्प्रेस ठाणे-विद्याविहार दरम्यान आणि अप मेल-एक्स्प्रेस ठाणे-विक्रोळी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे मेल एक्स्प्रेस सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
‘प.रे.’ही धावणार १५ मिनिटे उशिराने
पश्चिम रेल्वेवर वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री
११ वाजून ४५ मिनिटे ते रविवारी रात्री २ वाजून ४५ मिनिटे या काळात तीन तासांचा अप जलद मार्गावर ब्लॉक घेणार आहे. तर डाऊन जलद मार्गावर रात्री दीड ते रविवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मेल एक्स्प्रेस १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.