नाइटलाइफ केवळ श्रीमंती चोचले
By admin | Published: April 4, 2015 05:44 AM2015-04-04T05:44:46+5:302015-04-04T05:44:46+5:30
असे म्हणतात की, मुंबई कधीच झोपत नाही. मग येथे नाइटलाइफ कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मायानगरी मुंबापुरीत अशी बरीच ठिकाणे आहेत.
असे म्हणतात की, मुंबई कधीच झोपत नाही. मग येथे नाइटलाइफ कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मायानगरी मुंबापुरीत अशी बरीच ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी रात्रीच्या कोणत्याही वेळी पोटोबा करता येतो. फरक एवढाच की रात्री-अपरात्री जिभेचे चोचले पुरविणारा वर्ग हा उच्चभ्रू, श्रीमंतांचा आहे. त्यात किंचितसे प्रमाण सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचेही आहे. त्यामुळे नाइटलाइफचा हा अट्टहास नेमका कोणासाठी? नेमके हेच ‘टीम लोकमत’ने मध्यरात्री संचार करीत रिअॅलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला. त्यातून नाइटलाइफची ओरड फक्त श्रीमंतांसाठी असल्याचे निदर्शनास आले.
मुंबईतील गेल्या काही दिवसांतील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून खटला दाखल करून घेतला आहे आणि त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने डान्सबार बंदीमुळे महिलांवर होणारे अत्याचार कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर नाइटलाइफ सुरू करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. पण मद्याची दुकाने आणि पब रात्रभर सुरू राहणार आहेत का? संख्या कमी असल्याने पोलीस यंत्रणेवर आधीच दबाव येत आहे.
पोलीस यंत्रणा नाइटलाइफवेळी महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम आहे का आणि सरकारने असा निर्णय घेतला असेल तर रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे का, असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले आहेत.
तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा व विविध तज्ज्ञांमार्फत आढावा घ्यावा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने नाइटलाइफ निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.