Join us

मुंबईत २६ जानेवारीपासून नाइटलाइफ सुरू; आदित्य ठाकरेंचा प्रयोग यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 4:54 AM

नरिमन पॉइंट, काळा घोडा, बीकेसीत प्रयोग : मॉल्स, हॉटेल्स, दुकाने २४ तास खुली राहणार

मुंबई : महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेमार्फत आयोजित ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२०’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइटलाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जगभरातील अनेक महानगरांत नाइटलाइफची व्यवस्था आहे. तशी मुंबईतही हवी, असा विचार मांडत आदित्य ठाकरे यांनी त्यासाठी आग्रह धरला होता. वर्षभरापूर्वी सरकारने याबाबत अधिसूचना काढली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे उपस्थित करीत या उपक्रमाला हिरवा कंदील मिळाला नव्हता. आता मात्र प्रजासत्ताक दिनापासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे.

या उपक्रमात आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास मुंबईकरांना सेवा-सुविधा मिळणार असल्याने उद्योग-रोजगार वाढेल. रात्रभर कामानिमित्त घराबाहेर असणाºयांची सोय होईल. त्यामुळे नाइटलाइफ फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाइटलाइफला भाजपच्या विरोधाबद्दल विचारता अहमदाबादमध्ये नाइटलाइफ चालते, मग मुंबईत का नाही? मुंबईने मागे का राहावे, असा प्रतिप्रश्न ठाकरे यांनी केला. मनोरंजनासोबत रोजगारनिर्मिती करणे, पर्यटन वाढविणे हा नाइटलाइफ सुरू करण्याचा उद्देश आहे. मात्र व्यवसायातील फायद्याच्या दृष्टीने आठवडाभर २४ तास दुकाने, मॉल आदी खुले ठेवायचे की नाही, हा निर्णय त्यांच्या मालकांवर अवलंबून असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रोचा अहवाल अद्याप नाहीमेट्रो प्रकल्प ३ चे कारशेड गोरेगाव येथील आरे संकुलात ठेवायचे का, याबाबत निर्णय घेण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने अद्याप आपला अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.शांतताभंगाला विरोधनाइटलाइफच्या निमित्ताने निवासी भागात २४ तास हॉटेल सुरू ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल; तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी भाजपचा विरोध मांडला. नाइटलाइफ संदर्भातील नियमावली अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. ती जाहीर झाल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करू. कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार व्हायला हवा. या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार असून, अनेक नवे प्रश्न निर्माण होतील, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :आदित्य ठाकरेनाईटलाईफमुंबई