Join us

नाईकांचा सेफ गेम

By admin | Published: April 25, 2015 4:49 AM

नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांपैकी सर्वाधिक ५२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने ४ अपक्षांना सोबत घेऊन महापौरपदाची मोर्चेबांधणी करतानाच १० जागा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांपैकी सर्वाधिक ५२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने ४ अपक्षांना सोबत घेऊन महापौरपदाची मोर्चेबांधणी करतानाच १० जागा जिंकणाऱ्या काँगे्रसलाही मदतीचा हात पुढे करून आघाडीचा सेफ गेम खेळला आहे. तोडफोडीच्या राजकारणात माहीर असलेल्या ठाणेकर एकनाथ शिंदेंकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून त्यांनी आधीच ही व्यूहरचना केली आहे. काँगे्रसने मदत केल्यास राष्ट्रवादीचे ५२ + ४ अपक्ष + १० काँगे्रस = ६६ असे सेफ संख्याबळ होऊन कायमची डोकेदुखी मिटू शकते. यामुळे गणेश नाईक यांनी काँगे्रसला मदतीचा हात दिला आहे. त्यातच नाईकांशी फारसे सख्य नसलेल्या स्थानिक काँगे्रसजनांनी प्रदेश काँगे्रसचा आदेश शिरसावंद्य, असे सांगून शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे.या निवडणुकीत शिवसेनेला ३८ तर भाजपाच्या सहा अशा ४४ जागा युतीला मिळाल्या आहेत. तसेच सीमा गायकवाड यांच्या रूपाने युतीचा एक बंडखोर निवडून आला आहे. त्यामुळे अपक्ष सुधाकर सोनवणेंना महापौरपदाचे गाजर दाखवून अन् काँगे्रसला हाताशी धरून नाईकांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनवणे यांना मतमोजणी सुरू असतानाच पत्रकारांसमोरच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन गेला होता. तसेच काही मध्यस्थांमार्फत त्यांनी काँगे्रसशी संधान साधून उपमहापौरपदासह स्थायी समितीत स्थान देण्याचा प्रयत्न चालविल्याचे उघड झाल्याने सत्तास्थापनेच्या शिवसेनेच्या हालचाली समोर आल्या आहेत. यात अपक्षांच्या पळवापळवीचे प्रकार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येत्या ९ मे रोजी कुणाचा महापौर बसतो, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)