गेटवे, भाऊचा धक्का येथील जलप्रवासींची सुरक्षा वाढवा- डॉ. नीलम गो-हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 07:06 PM2017-07-26T19:06:50+5:302017-07-26T20:51:34+5:30
जुनाट व गळक्या बोटी, जेटींवर अस्वच्छता आणि अंधार यामुळे गेटवे आणि भाऊचा धक्का येथून जलप्रवास करणे धोक्याचे बनले
मुंबई, दि. 26 - जुनाट व गळक्या बोटी, जेटींवर अस्वच्छता आणि अंधार यामुळे गेट वे आणि भाऊचा धक्का येथून जलप्रवास करणे धोक्याचे बनले असून या अप्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला अशी जोरदार मागणी शिवसेनेने आज विधान परिषदेत केली.
गेटवे, भाऊचा धक्का येथून मांडवा, उरण येथे बोटींद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. परंंतु या बोटी असुरक्षित आहेत. गळक्या आहेत. या बोटी थांबतात त्या जेटींवर अस्वच्छता असून दिवेही नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे असा मुद्दा शिवसेना आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला.
कोणत्याही सुविधा नसताना जून ते सप्टेंबर या कालावधीत या बोटींचा तिकीटदरही वाढवला जातो. जेटींवर मासळी उतरवली जात असल्याने तिथे दुर्गंधी वाढली आहे. प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. बोटमालक आणि बंदर विभागाचे अधिकारी यांच्यात संगनमत असल्याने यावर तक्रारी करूनही काहीच कारवाई केली जात नाही. हप्रवाशांची सुरक्षा वाढवण्यास आणि अवाजवी शुल्कवाढ रोखण्यास राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार डॉ. गो-हे यांनी केली.
यावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देताना सांगितले की, या मार्गांवर २५ बोटी कार्यरत आहेत. त्यांची वाहतूक खाजगी संस्थांकडून केली जाते. जेटींचे ऑडिट करून गैरसोयी दूर करण्याचा कालबध्द कार्यक्रम बनवला गेला असून मोरा, रेवस जेटींची दुरूस्ती एक वर्षात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. बोटींमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असेल तर संबंधित बोटींवर कारवाई केली जाईल असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.
आमदार डॉ. गो-हे यांच्या मागणीला पाठिंबा देत काँग्रेसचे संजय दत्त यांनी प्रवासी बोटींमध्ये सुरक्षा जॅकेट्सचा तुटवडा असल्याचे सांगून या बोटींची तातडीने पाहणी करावी अशी मागणी केली. यावर आपण स्वतः जाऊन या बोटींची पाहणी करू असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई-गोवा बोट सुरू करा
यावेळी भाजपाचे भाई गिरकर यांनी मुंबई-गोवा बोट तसेच नरिमन पॉर्इंट ते बोरीवली जलप्रवास सुरू करण्यासाठी काय पावले उचलली असे विचारले. त्यावर मुंबई-गोवा जलवाहतुकीला परवानगी मिळाली असून नरिमन पॉर्इंट-बोरीवली जलप्रवास योजनेसाठी सल्लागार समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली.आमदार विद्या चव्हाण यांनी गोराई ते गेटवे असा जलप्रवास सुरू करण्याची मागणी यावेळी केली.