Join us

निलेश लंके यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; ज्योती देवरे यांच्याबाबत चर्चा झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 3:12 PM

निलेश लंके यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत ज्योती देवरे यांनी सुसाईड ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र निलेश लंके यांनी देवरे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच लंके यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन देवरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे दिले. याचपार्श्वभूमीवर लंके यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

निलेश लंके यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यांनी मुंबई ते नागपूर असा एकत्र विमान प्रवास केल्याचेही समजते. यामध्ये लंके यांनी फडणवीस यांची भेट घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या गैरकारभाराची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे. देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. तर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरमध्ये येऊन थेट तहसीलदार देवरे यांची भेट घेतली. 

तत्पूर्वी, मी कोणताही भ्रष्टाचार, घोटाळा अथवा अनियमितता केलेली नाही, हे पुन्हा एकदा ठणकावून सांगते आहे. या पलीकडे मी काहीही स्पष्टीकरण देण्याच्या मन:स्थितीत नाही. मला जे काही स्पष्टीकरण द्यायचे आहे, ते वरिष्ठांकडे सादर केले जाईल. यापूर्वीही माझ्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेल्या आहेत. ‘ती’ क्लिप मी व्हायरल केलेली नाही. मी माझे शासकीय कामकाज करीत आहे. प्राप्त परिस्थितीत नाउमेद न होता मी पुन्हा जिद्दीने वाटचाल करणार आहे, असं ज्योती देवरे यांनी सांगितले. 

दरम्यान, तहसीलदार देवरे यांची स्वत:च्या आवाजातील ११ मिनिटांची क्लिप शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यात आमदार लंके यांच्यासह प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार लंके यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन देवरे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे दिले. देवरे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींबाबत चौकशी केल्यानंतर त्यामध्ये त्या दोषी आढळून आल्या आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्येही तथ्य आढळून आले आहे, असे लंके यांनी हजारे यांना सांगितले. देवरे यांच्याविरुद्ध झालेल्या तक्रारी, त्यानंतर झालेली चौकशी, त्यात देवरे यांच्यावर ठेवण्यात आलेला ठपका, लंके यांना रात्री-अपरात्री पाठविण्यात आलेले मेसेज, तहसीलदार म्हणून काम करताना त्यांच्यावर झालेले आरोप, जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिलेला अहवाल, असे सर्व पुरावे लंके यांनी हजारे यांना सादर केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी देवरे यांच्यावरील तक्रारींबाबतचा चौकशी अहवाल ६ ऑगस्ट रोजीच नाशिक येथील विभागीय आयुक्तांना पाठविला होता. शेतजमीन रहिवास करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रांताधिकाऱ्यांना न देणे, त्यांचे अधिकार वापरून जमीन वापरास परवानगी देणे, अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी दंडाची रक्कम शासनाकडे जमा न करणे, कोविड सेंटरच्या तपासणीची कागदपत्रे उपलब्ध करून न देणे आदींबाबत देवरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ३ चा भंग केल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी देवरे यांच्या क्लिपप्रकरणी उपजिल्हाधिकारी सदस्य असलेली तीन सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा