मुंबई - मागील अनेक महिन्यांपासून पुणे मनसेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. याठिकाणी माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि इतर पदाधिकारी असा वाद निर्माण झाला आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भोंग्यावरील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ शहराध्यक्षपदावरून काढण्यात आले. मात्र वसंत मोरे आणि त्यांच्या समर्थकांची वारंवार कोंडी करण्यात येत असल्याचं समोर येत आहे.
२ दिवसांपूर्वी मनसे नेते वसंत मोरे(Vasant More) यांचे कट्टर समर्थक असणारे निलेश माझिरे यांनी पक्षाच्या गटबाजीला कंटाळून पदांचा राजीनामा दिला त्याचसोबत पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांवर आरोप लावले. निलेश माझिरे यांनी म्हटलं होतं की, पुण्यातील कोअर कमिटीच्या हुकुमशाहीला कंटाळून मी पक्ष सोडत आहे. पक्षासाठी रात्र न पाहता काम करत राहिलो. अंगावर गुन्हे घेतले त्याचे फळ काय तर पदावरून पायउतार व्हावं लागलं. जिल्हाध्यक्ष पद थांबवले. याला पूर्णत: पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि बाबू वागस्कर जबाबदार आहेत. असेच राहिले तर पक्ष तळाशी गेल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.
यानंतर निलेश माझिरे आणि वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर निलेश माझिरे यांची नाराजी दूर झाली. त्याचसोबत राज ठाकरेंनी निलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचं पत्र स्वत:च्या हाताने त्यांना दिले. यावेळी मनसेचे नेते वसंत मोरेही उपस्थित होते. राज ठाकरेंच्या किमयामुळे निलेश माझिरे अवघ्या ४८ तासांत पुन्हा मनसे पक्षात सक्रीय झाले आहेत.
पक्ष सोडणार असल्याच्या अफवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी निलेश माझिरे यांनी पक्ष सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह आले. त्यात निलेश माझिरेही सोबत होते. निलेश माझिरे पक्ष सोडणार असल्याच्या अफवा पक्षातील काही जणांकडून उठवल्या जात आहेत. निलेश माझिरे मनसेत आहे अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या सभेनंतर १५ दिवसांनी माझिरे यांनी मनसेच्या २ पदाधिकाऱ्यांवर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचीही चर्चा होती. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांची नाराजी दूर केली आहे.