संजय राऊतांना टीव्ही आणि उद्धव ठाकरेंना कॅडबरी चॉकलेट द्या; निलेश राणेंनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 08:53 PM2019-11-09T20:53:49+5:302019-11-09T21:11:29+5:30
राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. त्यातच आज राज्यपालांनी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. मात्र गेल्या पाच सहा दिवसांपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून महाराष्ट्रातील जनतेची देखील हीच इच्छा असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील संजय राऊत यांच्या नावाची चर्चा होती. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला शरद पवार यांच्या घरी जावं लागतं. त्यामुळे बाकी राहुद्या अगोदर संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे द्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या' असं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला cadbury चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 8, 2019
भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिलेच नव्हते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला आहे. तसेच बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी शहा-फडणवीसांच्या आशीर्वादाची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा झाली होती आणि त्यात त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याबाबच आश्वासन दिले होते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा खोडून काढला. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी युतीबाबत चर्चा करताना आम्हाला उपमुख्यमंत्रिपद देऊ असे सांगितले होते. युतीबाबतची चर्चा एकदा फिस्कटल्यानंतर अमित शाहांचा मला फोन आला होता. त्यावेळी त्यांनी उद्धवजी तुम्हाला काय पाहिजे अशी विचारणा केली. तेव्हा मी सांगितले की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर आणेन असे वचन दिले असल्याचे देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, ''आता मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. खोटं बोलणं आमच्या संस्कारात नाही. खरा कोण, खोटा कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे खोटारडेपणा जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत भाजपाशी चर्चा करणार नाही. तसेच मला खोटा ठरवत असतील तर भाजपाशी कोणतंही नातंही ठेवणार नाही,'' असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.