...यांच्या धमक्यांना भीक घालू नका; देवेंद्र फडणवीसांसाठी राणेपुत्र मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:56 PM2020-05-05T18:56:08+5:302020-05-05T19:01:32+5:30
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेला भाजपा यांच्या समर्थकांत सोशल मीडियावर तुंबळ शाब्दिक युद्ध रंगले आहे.
मुंबई - एकीकडे राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप घेत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेला भाजपा यांच्या समर्थकांत सोशल मीडियावर तुंबळ शाब्दिक युद्ध रंगले आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील नेत्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यासाठी एखादी टोळी किंवा कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे, असा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रोलर्सचे लक्ष्य होत असलेल्या फडणवीस यांच्या मदतीसाठी आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे मैदानात उतरले आहेत.
निलेश राणे यांनी एक ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यांच्या धमक्यांना घाबरू नका. यांची पात्रता मला माहिती आहे. शत्रू जसा आहे तसच त्याला उत्तर गेलं पाहिजे, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. निलेश राणे यांच्या या ट्विटमुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सुरू असलेले ट्रोलिंग अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
ह्यांच्या धमकींना भीक घालू नका. शेंबडे आहेत सगळे. बोटं दाबून भाई झाले पण समोर कोण येत नाही. ह्यांची लायकी मला चांगली माहीत आहे. शत्रू जसा आहे तसच त्याला उत्तर गेलं पाहिजे. https://t.co/HWCPgEfXJB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 5, 2020
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या राज्यातील नेत्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील भाजप आमदारांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या देण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत अयोग्य भाषेचा वापर होत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तापक्षातील लोक अयोग्य पद्धतीने सोशल मिडीयाचा वापर करत आहेत, असे भाजपा आमदार अनिल सोले यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा नेत्यांविरोधात सुरू असलेल्या ट्रोलिंगविरोधात मुंबईतही तक्रार करण्यात आली आहे.