मुंबई
सक्तवसुली संचालनालयाकडून(ईडी) शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आपण कष्टानं कमावलेल्या पैशातून खरेदी केलेले छोटे प्लॉट आणि माझं राहतं घर ईडीनं जप्त केलं आहे, असं म्हटलं. राऊतांच्या विधानावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "संजय राऊत नेमकं काय काम करतात? 'सामाना'तील कष्टातून त्यांनी इतकी कोट्यवधींची संपत्ती कमावली का?", असा थेट सवाल निलेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आजवर कोट्यवधींचा काळापैसा कमावला असल्याचा आरोप देखील निलेश राणे यांनी यावेळी केला. "इतक्या वर्षांपासून जो काही काळा पैसा संजय राऊतांनी कमावला आहे. तो कधी ना कधी बाहेर येणारच होता", असं निलेश राणे म्हणाले. तसंच संजय राऊत नेमकं कसले कष्ट करतात? रोजरोज महागडे कोट घालून फिरतात इतक्या जमिनी त्यांच्या नावावर आहेत. मेहनतीचं वगैरे राऊतांनी बोलूच नये. मग 'सामना'तील कष्टातून इतकी कमाई त्यांनी केलीय का?, असं सवाल निलेश राणे यांनी केला आहे.