प्रत्येक गोष्टीत लोकांची जबाबदारी, मग ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे
By मोरेश्वर येरम | Published: November 21, 2020 11:35 AM2020-11-21T11:35:19+5:302020-11-21T11:43:05+5:30
दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली, या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विधानाचा निलेश राणे यांनी समाचार घेतला.
मुंबई
प्रत्येक गोष्टीत जर लोकांवर जबाबदारी ढकलण्यात येणार असेल तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का? असा खरमरीत टोला भाजप नेते निलेश यांनी हाणला आहे. राणे कुटुंबियांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. निलेश आणि नितेश हे राणे बंधू विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला वारंवार फैलावर घेताना दिसतात. यावेळी निलेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला आहे.
दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली, या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विधानाचा निलेश राणे यांनी समाचार घेतला. 'शिवसेनेत सगळेच एकापेक्षा एक विद्वान भरलेत. सर्वात आधी दारुची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झालेत? याची यादी जारी करा', असा टोला निलेश यांनी पेडणेकर यांना लगावला आहे.
वाढीव वीज बिलात सवलत न देण्याच्या मुद्द्यावरुनही निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान केलं. 'अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधारणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?', असा टोला निलेश यांनी ट्विट म्हणून लगावला आहे.