लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि माहीम स्थानकांदरम्यान जानेवारीत साडेनऊ तासांचे दोन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मुंबई विभागातील मिठी नदीवर माहीम आणि वांद्रे दरम्यान ब्रिटिशकालीन स्कू ब्रिज आहे. या पुलाचे खांब हळूहळू जमिनीमध्ये खचत असून त्यांची सुधारणा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा पूल १८८८ साली कास्ट आयनपासून बनलेल्या स्क्रू पासून तयार केला. त्याच्या सहा खाबांपैकी चर्चगेट दिशेकडील पहिला खांब कमकुवत झाला आहे. त्याचे पाडकाम करून त्याजागी नवा खांब उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७०० आणि ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनचा वापर होणार आहे. तसेच नदी प्रवाह रोखण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्यात येणार आहे.
असे केले जाईल
काम जुन्या पुलाच्या खांबाच्या पडकामाआधी ब्लॉक कालावधीत पुलाचे ९.५ मीटरचे ट्रॅक गर्डर काढून त्याजागी तात्पुरता २० मीटरचा गर्डर बसविण्यात येईल.
असा असेल ब्लॉक
२४ आणि २५ जानेवारी २०२५ असे सलग दोन दिवस रात्रीपासून साडेनऊ तासांचा ट्रॅक ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक दोन्ही अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर दुसरा ब्लॉक दोन्ही अप आणि डाऊन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे. यावेळी दादर ते अंधेरीदरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवांवर लक्षणीय परिणाम होणार आहे. ब्लॉकनंतर ट्रेन पहिले ३ ते ४ दिवस २० किमी प्रतितास वेगाने धावतील, त्यानंतर काम पूर्ण होईपर्यंत ४० किमी प्रतितास वेग मर्यादा असेल.