विनातिकीट प्रवाशांकडून महिनाभरात साडेनऊ कोटींचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:01+5:302021-06-04T04:06:01+5:30
अनियमित प्रवाशांचाही समावेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत ...
अनियमित प्रवाशांचाही समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात एप्रिल -२०२१ ते मे -२०२१ या कालावधीत विनातिकीट व अनियमित प्रवाशांच्या १.५० लाख प्रकरणांमधून साडेनऊ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सरकारच्या सूचनेनुसार आणि कोविड प्रोटोकॉलनुसार केवळ अनुमती असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमधून प्रवास करता येतो. विनातिकीट व अनियमित प्रवाशांच्या तपासणीसाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय तसेच मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली आहे.
मे महिन्यात विनातिकीट व अनियमित प्रवाशांची ५४,००० प्रकरणे नोंदली. त्यांच्याकडून साडेतीन कोटींचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये उपनगरीय भागातील ३२,००० प्रकरणांचा समावेश आहे. तर मेल-एक्स्प्रेस विभागातील २२,००० प्रकरणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तिकीट तपासनिसांच्या विशेष पथकाने १७ एप्रिल ते २ जून या कालावधीत मुखपट्टी न घातलेल्या १२६९ व्यक्तींकडून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल केला.
तर, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनधिकृत प्रवासाची २०१८ प्रकरणेही आहेत. त्यांच्याकडून दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.