म्हाडाच्या नऊ इमारती अतिधोकादायक
By admin | Published: May 26, 2017 12:53 AM2017-05-26T00:53:41+5:302017-05-26T00:53:41+5:30
मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले असून, सर्वेक्षणांती एकूण ९ इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे गुरुवारी वांद्रे येथील मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
९ अतिधोकादायक आढळलेल्या उपकरप्राप्त इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक जाहीर केलेल्या सहा इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये २४७ निवासी अधिक २५३ अनिवासी असे एकूण ५०० रहिवासी/भाडेकरू आहेत. या इमारतींपैकी दोन इमारतींना पुनर्विकासासाठी ना हरकत
प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
दहा निवासी भाडेकरू/रहिवाशांनी स्वत:ची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे.
आतापर्यंत २२ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरितांना पाडकामाची सूचना देत घरे रिकामी करून घेण्याची कारवाई सुरू आहे. उर्वरित २१८ निवासी भाडेकरू/रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असून, म्हाडाकडे सद्य:स्थितीमध्ये पुरेसे संक्रमण गाळे उपलब्ध आहेत.
राज्य सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी बायोमेट्रिक सर्व्हे हाती घेतला आहे. मात्र या सर्व्हेला रहिवाशांचा विरोध होत असला तरीदेखील रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. पुनर्विकासाबाबत भाडेकरू आणि इतर मुद्द्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. बीडीडी पुनर्विकासात म्हाडा ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करत असून, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
1‘रेरा’मध्ये आतापर्यंत दहा विकासकांच्या नोंदी झाल्या आहेत. म्हाडालादेखील ‘रेरा’मध्ये नोंद करावी लागणार आहे. १५ जूनपर्यंत ‘रेरा’मध्ये म्हाडाच्या प्रकल्पांच्या नोंदी केल्या जातील.
2अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना गुरुवारपासून सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. परिणामी अतिधोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करत असलेल्या रहिवाशांनी घरे रिकामी करावीत. आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन म्हाडाने केले आहे.
3‘सेस’ इमारतींसाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर उचित कार्यवाही केली जाईल. म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. १०४ लेआऊटवर काम सुरू आहे.
अतिधोकादायक इमारतींची नावे
इमारत क्रमांक १४४, एम.जी. रोड, एक्स्प्लेनेड मेंशन
इमारत क्रमांक २०८-२२०, काझी सय्यद स्ट्रीट
इमारत क्रमांक ५५-५७ नागदेवी क्रॉस लेन
इमारत क्रमांक ४४-४६, काझी स्ट्रीट/९०-९४-१०२, मस्जिद स्ट्रीट
इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमाम रोड
इमारत क्रमांक १७४-१९०, १२५-१३३, के.एम. शर्मा मार्ग
इमारत क्रमांक ३०-३२, दुसरी सुतार गल्ली
इमारत क्रमांक ३९ चौपाटी, सीफेस
इमारत क्रमांक ४६-५०, लकी मेन्शन, क्लेअर रोड
म्हाडाची कार्यवाही : अतिधोकादायक भागास टेकू लावण्यात येतो. सूचना फलक लावण्यात येतो. धोकादायक भाग पाडण्यात येतो. धोकादायक भाग दुरुस्त करणे. रहिवासी आणि भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात स्थलांतरण. रहिवाशांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतात.
म्हाडाचे आवाहन : इमारतीच्या अतिधोकादायक भागाचा वापर थांबवा. नोटीस बजावल्यानंतर गाळे रिकामे करा. धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करू नका. संक्रमण शिबिरात निवासस्थान मिळण्यासाठी अर्ज करा.
गेल्या कित्येक वर्षांपासून एक्स्प्लेनेड मेंशन या इमारतीचा म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत समावेश करण्यात येत आहे. इमारत ‘हेरिटेज’मध्ये मोडते. परिणामी पुनर्विकासाबाबत अडथळे असून, हे प्रकरण न्यायालयात आहे.
इमारतीच्या धोक्याची लक्षणे म्हाडाच्या निदर्शनास आणून देण्याकरिता इमारत क्रमांक ८९-९५ रजनीमहल, ताडदेव येथे चोवीस तास चालणारा नियंत्रण कक्ष खुला करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष : ९१६७५५२११२
च्मुंबई शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अ, ब आणि क वर्गातील एकूण १९ हजार ६४२ उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती व पुनर्रचना म्हाडामार्फत करण्यात येते.
च्सद्यस्थितीमध्ये उपकरप्राप्त इमारतींपैकी काही इमारती कोसळल्याने, तर काही अंत्यत मोडकळीस आल्याने तोडल्यामुळे, काही इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास झाल्याने, काही इमारती उपकरातून वगळल्याने प्रत्यक्षात अस्तित्त्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४ हजार ३७५ एवढी आहे.
उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण केवळ पावसाळापूर्व कालावधीत न करत सतत चालू ठेवण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. परिणामी सर्वेक्षणाची कार्यवाही सुरु असतानाच अतिधोकादायक इमारतींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार, सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात येत आहेत.
मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्ष
पालिका मुख्यालय, फोर्ट
दूरध्वनी : २२६९४७२५/२७
म्हाडा नियंत्रण कक्ष :
२३५३६९४५/२३५१७४२३
पावसाळापूर्व सर्वेक्षणात आढळून आलेल्या अतिधोकादायक इमारतींची यादी वृत्तपत्रातून रहिवाशांच्या माहितीकरिताही प्रसिद्ध केली जाते. शिवाय रहिवाशांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या दृष्टीने सूचनादेखील दिल्या जातात. परिणामी अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांनी वेळीच सावधानता बाळगावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.