Join us

मुंबईत नऊ रुग्णालये आजपासून ‘नॉन कोविड’; साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:03 AM

सोमवारपासून (२० जुलै) या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही.

मुंबई : कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगरपालिकेने उपनगरातील १६ रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली होती. आता यातील ९ रुग्णालये ‘नॉन कोविड’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

सोमवारपासून (२० जुलै) या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. मात्र, या नॉन कोविड रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू राहील आणि या रुग्णालयांत आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोविड केंद्र तसेच नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजार वाढतात. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

एप्रिलपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तसेच उपनगरातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभासह १६ रुग्णालये कोविड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता कोविड केंद्रांच्या रूपाने मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध झाल्याने उपनगरातील १६ पैकी ९ रुग्णालयांत सोमवारपासून नव्या कोरोना रुग्णांवर उपचार होणार नाहीत. सध्या या रुग्णालयांत जे दाखल रुग्ण आहेत, तेच रुग्ण येथे राहतील. सायन, केईएम आणि नायरमध्ये कोविड तसेच नॉन कोविड दोन्ही रुग्णांवर उपचार केले जातील. पण, अधिकाधिक रुग्णांना आता कोविड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार असल्याचेही मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

१६० दवाखानेही आता ‘नॉन कोविड’

मुंबईतील १८६ पैकी १६० दवाखानेही आता नॉन कोविड करण्यात आले आहेत. त्यामुळे आता केवळ २६ दवाखाने कोविडसाठी असणार आहेत, तर २८ प्रसूतिगृहांपैकी आता केवळ तीन प्रसूतिगृहे कोविड तर उर्वरित २५ नॉन कोविड असतील, असेही काकाणी यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई