मुंबईत नऊ लाख बोगस मतदान ओळखपत्रे - निरुपम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:13 AM2019-01-17T06:13:01+5:302019-01-17T06:13:12+5:30
निकाल फिरवण्यासाठी मतदार घोटाळा
मुंबई : मुंबईत तब्बल आठ ते नऊ लाख बोगस मतदान ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत. बोगस मतदारांच्या माध्यमातून निकाल फिरविण्याचा डाव आखण्यात आला आहे. बोगस ओळखपत्र माफिया आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणांच्या संगनमताने हा कट रचण्यात आल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.
आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी बोगस मतदार ओळखपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. एकाएका मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावे ११ ते १३ मतदान ओळखपत्रे वितरित झाली आहेत. व्यक्ती एकच मात्र वेगवेगळा पत्ता, जात-धर्म, वय आणि वेगळा बुथ नंबर टाकून मोठ्या प्रमाणावर ओळखपत्रे देण्यात आली आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात साधारण १५ ते २० हजार तर लोकसभा क्षेत्रात एक ते दीड लाख बोगस मतदार ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत. या आकडेवारीनुसार संपूर्ण मुंबईत आठ ते नऊ लाख बोगस मतदार असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
अणुशक्ती नगर, मानखुर्द आणि चांदिवली या मतदारसंघांतही १५ ते २० हजार बोगस ओळखपत्रे आढळून आल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
निवडणूक आयोग ३१ जानेवारी रोजी प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करणार आहे. त्याआधी सर्व बोगस मतदार ओळखपत्रे यादीतून वगळावीत, अशी मागणी निरुपम यांनी केली. विशेषत: ज्या भागातून काँग्रेसला मतदान होते तिथे हा प्रकार आढळून येत आहे. काँग्रेसविरोधात निकाल फिरविण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला.
माध्यमांना दिले पुरावे
‘एकलव्य’ सॉफ्टवेअरच्या साहाय्याने बोगस मतदार शोधल्याचा दावा करताना निरुपम यांनी मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघांतील यादी समोर ठेवली. मागाठाणे येथे ८३८ मतदार ओळखपत्रांपैकी फक्त १८२ खरे मतदार आहेत. तर, दिंडोशीत ५५२ पैकी २९० खरे मतदार आढळून आले आहेत, असा आरोप करीत निरुपम यांनी याबाबतची कागदपत्रे माध्यमांसमोर ठेवली.