विकासकामांवर 9 महिन्यांत केवळ ३७ टक्केच रक्कम खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:56 AM2019-01-09T05:56:40+5:302019-01-09T05:56:58+5:30
अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढली : निवडणुकीच्या काळात उडणार विकासकामांचा बार
मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी जाहीर होणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील तरतुदींतून केवळ ३६.७४ टक्के रक्कम ३१ डिसेंबरपर्यंत विकासकामांवर खर्च झाली आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांमध्ये विकासकामांचा बार उडविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू होणार आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना त्यातील ३० टक्केच रक्कम विकासकामांवर खर्च होत होती. यामुळे दरवर्षी अर्थसंकल्प वाढल्याचे दिसून येत होते. हा फुगवटा काढून आयुक्त अजय मेहता यांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प आणला. या पद्धतीच्या अर्थसंकल्पाचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी विकासकामांसाठी नऊ हजार ५४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदींपैकी तीन हजार ५०८ कोटी म्हणजेच ३६.७४ टक्के एवढी रक्कम विविध विकासकामांवर खर्च झाली आहे.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत विकासकामांवर ३१ टक्के रक्कम खर्च करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात विकासकामांवर जास्तीत जास्त तरतूद वापरली जावी, यासाठी आयुक्तांनी विशेष भर दिला होता. वर्षभर अधिकाºयांकडून त्यांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यात येत होता. याच्या फलस्वरूप विकासकामांवर जास्त रक्कम खर्च झाली. तसेच उर्वरित तीन महिन्यांमध्ये हा आकडा आणखी वाढेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावर ३१ डिसेंबरपर्यंत तरतुदीच्या १५.२७ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प
पाच वर्षांत विकासकामांवरील सर्वाधिक खर्च (३१ डिसेंबरपर्यंत)
वर्ष खर्च (टक्केवारी)
२०१४ २५.६३
२०१५ २३.२४
२०१६ १६.८१
वर्ष खर्च (टक्केवारी)
२०१७ ३१.०१
२०१८ ३६.७४