नऊ अधिकाऱ्यांनी केली नारायण राणेंच्या बंगल्याची तीन तास तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 10:23 AM2022-02-22T10:23:45+5:302022-02-22T10:26:12+5:30

आता लक्ष अनधिकृत बांधकाम प्रकरणाच्या अहवालाकडे.

Nine officers inspect Narayan Rane's bungalow for three hours | नऊ अधिकाऱ्यांनी केली नारायण राणेंच्या बंगल्याची तीन तास तपासणी

नऊ अधिकाऱ्यांनी केली नारायण राणेंच्या बंगल्याची तीन तास तपासणी

googlenewsNext

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईच्या जुहू परिसरातील अधीश बंगल्याची महापालिकेच्या पथकाने सोमवारी सुमारे ३ तास तपासणी केली. बंगल्याचा मूळ आराखडा व प्रत्यक्षातील बांधकामाची यावेळी छाननी करण्यात आली. प्रत्येक मजल्यावरील बांधकामाची मोजणी आणि छायाचित्रे घेण्यात आली. चार अधिकाऱ्यांसह ९ जणांचा पथकामध्ये समावेश होता.

तपासणी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे बंगल्यात उपस्थित होते. आजच्या छाननीचा अहवाल सादर करून त्यातील बेकायदेशीर बांधकामाबद्दल नव्याने नोटीस बजावली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपासणी सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


मुंबई महापालिका आगामी  निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर शिवसेना व राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळला असताना, त्यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीबद्दल महापालिकेच्या अंधेरीतील के/वेस्ट  विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी पालिकेचे पथक बंगल्यात गेले होते. मात्र त्यावेळी राणे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती हजर नसल्याने पथक तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन तपासणीविना परत गेले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी वाॅर्ड अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांचे पथक तेथे पोहोचले. पथकाने पालिकेकडे सादर केलेला बंगल्याचा मूळ आराखडा, त्यांना दिलेल्या मंजुरीचे प्लॅन आणि तेथे प्रत्यक्षात झालेल्या बांधकामाची पाहणी केली. बंगल्याच्या चारही दिशेने मोजमाप घेण्यात आले. शिवाय त्याचे फोटो घेण्यात आले. प्रत्येक मजल्यावर जाऊन मापे घेण्यात आली.

 ‘रिफ्यूज’ क्षेत्रात बांधकाम?
नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात नियमबाह्यपणे ‘रिफ्यूज’ क्षेत्रात म्हणजे, अत्यावश्यकवेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकळा सोडण्यात आलेल्या जागेवर बांधकाम केले आहे. त्याबाबत एमआरटीपी ५३ अंतर्गत त्यांना लवकरच नोटीस बजावली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्याकडून आजच्या तपासणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाणार आहे.

नारायण राणेंचे मौन
महापालिकेच्या नोटिसीबद्दल राजकीय सुडापोटी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी शनिवारी केला आहे. आज मात्र त्यांनी याबाबत काहीही भाष्य न करता मौन बाळगणे पसंत केले. त्यांनी सुरुवातीला अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते अन्य खोलीत निघून गेले. योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

काय आहे आक्षेप?
आरटीआय कार्यकर्ते संतोष जोंधकर यांनी २०१७ मध्ये राणे यांच्या जुहूमधील  बंगल्याचे  बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केले आहे. त्यामध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी तक्रार  केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र पाठविले होते.  

Web Title: Nine officers inspect Narayan Rane's bungalow for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.