दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाइल नंबर पाठ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:38+5:302021-07-09T04:06:38+5:30
मुंबई : हल्ली प्रत्येक माणसाच्या हातात मोबाइल आल्यापासून फोन डायरी, दैनंदिनी, रोजनिशी, कॅल्क्युलेटर या सर्व गोष्टी दूर झाल्या आहेत. ...
मुंबई : हल्ली प्रत्येक माणसाच्या हातात मोबाइल आल्यापासून फोन डायरी, दैनंदिनी, रोजनिशी, कॅल्क्युलेटर या सर्व गोष्टी दूर झाल्या आहेत. सर्व फोन क्रमांक मोबाइलमध्येच सेव्ह होत असल्याने आता अनेक जण मोबाइल क्रमांक पाठ करून ठेवण्याचेदेखील कष्ट घेत नाही. परंतु यापैकी अनेक जणांना आपल्या बायकोचा मोबाइल क्रमांकदेखील पाठ नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता लोक पूर्णपणे मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बाजारपेठ व चौकांमधील अनेक नागरिकांना आपल्या बायकोचा क्रमांक विचारला असता तोदेखील त्यांना पाठ नसल्याचे आढळून आले. पूर्वी लोकांना घरचा क्रमांक, शेजाऱ्यांचा क्रमांक, कार्यालयातील क्रमांक तसेच इतर अनेक नातेवाइकांचे क्रमांक तोंडपाठ असायचे. मात्र आता स्वतःचा नंबर सोडता इतर फोन क्रमांक लोकांना पाठ नसतात.
लोकमत @मुंबई
अ - एकाला वडिलांचा क्रमांक आठवला, परंतु बायकोचा क्रमांक नाही आठवला.
ब - एकाला स्वतःच्या क्रमांकाव्यतिरिक्त इतर कोणाचेच क्रमांक पाठ नव्हते.
क - एकाला दुकानातील नोकरांचे क्रमांक पाठ होते, मात्र घरातील सदस्यांचे क्रमांक पाठ नव्हते.
ड - एकाला बायको व मुलांचे क्रमांक पाठ होते, इतर कोणतेच क्रमांक पाठ नव्हते.
ई - एकाला आई-वडिलांचा क्रमांक आठवला, परंतु बायकोचा क्रमांक आठवला नाही.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळे सारखेच!
शहरातील परिसरांमध्ये लोकांना विचारणा केली असता अनेकांना एकमेकांचे वाढदिवस मोबाइल क्रमांक अशा गोष्टी पाठ नसल्याचे दिसून आले. वाढदिवसाची तारीख ही सोशल मीडियाद्वारे कळत असल्याचे अनेकांनी सांगितले. तर मोबाइल क्रमांकाविषयी विचारणा केली असता तरुण वर्ग हा पूर्णपणे मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून आले. अनेक तरुणांना आपल्या आई-वडिलांच्या मोबाइल क्रमांकव्यतिरिक्त इतर कोणाचेच मोबाइल क्रमांक पाठ नसल्याचे आढळून आले. तर वृद्ध नागरिकांना पूर्वीप्रमाणे डायरी सांभाळून ठेवण्याची सवय असल्याने त्यांनी काही महत्त्वाचे क्रमांक डायरीमध्ये लिहून ठेवले असल्याचे सांगितले. परंतु त्यांनादेखील घरातील मोजक्या सदस्यांचे क्रमांक पाठ असल्याचे दिसून आले. यामुळे आता सर्व जण मोबाइलवरच अवलंबून असल्याचे दिसून येते.
बायकांनाही पतीदेवाचा नंबर आठवेना
एक गृहिणी - मला मुलांचे क्रमांक पाठ आहेत. मात्र पतीच्या मोबाइल क्रमांकाचे सुरुवातीचे चार आकडे पाठ आहेत पुढील आठवत नाहीत.
एक गृहिणी - मोबाइलमध्ये सर्व काही सेव्ह होत असल्याने आता क्रमांक पाठ करून ठेवण्याचा काळ गेला आहे. त्यामुळे स्वतःचा मोबाइल क्रमांक सोडता इतर कोणाचेच क्रमांक पाठ नाहीत.
मुलांना मात्र आईबाबांचा नंबर पाठ..
संचित केदारे - शाळेत असल्यापासूनच सुरक्षेचा उपाय म्हणून आईवडिलांनी स्वतःचे नंबर पाठ करून घेतले होते. तेव्हापासून ते मोबाइल क्रमांक पाठच आहेत.
प्रत्युष मोकल - प्रत्येक मुलाला आपल्या घरातल्या सदस्यांचे नंबर पाठ असायलाच हवेत. संपूर्णपणे मोबाइलवर अवलंबून राहणे चुकीचे आहे.
मुलांना आठवते मोठ्यांना का नाही?
हल्लीची मुले ही टेक्नॉलॉजी सोबत लवकर जुळवून घेतात. त्याबाबतीत मोठे लवकर जुळवून घेत नाहीत. त्यांना सर्व गोष्टी डायरीमध्ये लिहून ठेवण्याची सवय असते. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचा मोबाइल क्रमांकदेखील विसरतात. याबाबतीत मुलांना मोबाइल क्रमांकासोबत अनेक गोष्टींचे पासवर्डदेखील अचूक लक्षात असतात.
- डॉ. समीर आव्हाड, मानसोपचारतज्ज्ञ