नीरव मोदीकडून नऊ याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:33 AM2018-10-30T05:33:53+5:302018-10-30T05:34:14+5:30
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळ्या नऊ याचिका दाखल केल्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे.
आपण फरार नाही, तसेच आपण तपासासाठी सहकार्य करत नाही, हा ईडीने केलेला दावा खोटा आहे, असे मोदी याने त्याच्या याचिकांत म्हटले आहे. न्यायालयाने सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांना आर्थिक फरारी गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात यावे व त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी, यासाठी ईडीने काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज सादर केला. या अर्जावर मोदीने उत्तर दिले आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रीच कँडी शाखेत तब्बल १२ हजार ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. अॅक्सिस आणि अलाहबाद बँकेच्या परदेशी शाखांचाही या घोटाळ्यात फसगत झाल्याचे निदर्शनास आले. हा घोटाळ्याचा कट नीरव मोदी, मेहुल चोक्सी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी रचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोदी व चोक्सी यांना अटक करण्यापूर्वीच त्यांनी देशाबाहेर पळ काढला.