Join us

परीक्षेला गैरहजर समजून दिले शून्य गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 6:59 AM

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार; उत्तरपत्रिकाच तपासली न गेल्याने गैरहजेरीचा शेरा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या पाचव्या सेमिस्टर परीक्षेच्या एका पेपरला विद्यार्थिनीला शून्य गुण देण्यात आले. परीक्षेला हजर असूनही उत्तरपत्रिकाच तपासली न गेल्याने ती गैरहजर असल्याचा शेरा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्याचा या विद्यार्थिनीचा आरोप आहे.

विधि शाखेची पाचवी सेमिस्टर देणाऱ्या काजल पाटील हिला पीआयएल या विषयात शून्य गुण देऊन नापास करण्यात आले. तिने विद्यापीठात चौकशी केली असता ती गैरहजर असल्याचे समोर आले. जी. जे. आडवाणी महाविद्यालयात शिकत असलेल्या काजलने परीक्षेतील हजेरीची नोंद व अर्ज सादर करुनही तिने उत्तरपत्रिका पुनर्तपासणीला देऊ नये, असा सल्ला परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचे तिचे म्हणणे आहे. दरम्यान, तिला पुन्हा आठ दिवसांनी येण्यास सांगितले. त्या वेळी तिचा अर्ज पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तिला देण्यात आली. याचे कारण काजलने अधिकाºयांना विचारले असता अजून बºयाच विद्यार्थ्यांसोबत असा प्रकार घडल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रित पुनर्तपासणीसाठी पाठविणार असल्याचे तिला सांगण्यात आले.परीक्षा विभागाच्या या बेजबाबदारपणामुळे काजलसारख्या अनेकांचे वर्ष वाया जाणार असून कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद सभा घेण्याऐवजी स्वत:च्या प्रशासकीय अधिकाºयांशी संवाद साधावा, अशी प्रतिक्रिया स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.

मेरिट ट्रॅकसारख्या कंपनीला कंत्राटे देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे.

लवकरच योग्य निकाल देण्यात येईलतांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला. कधीकधी हॉलतिकीट किंवा आसन क्रमांक चुकीचा टाकला गेल्यामुळे उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासली असली तरी दाखवली जात नाही. मात्र अर्ज आल्यानंतर ती शोधून दिली जाते. या प्रकरणातही विद्यार्थिनीला लवकरात लवकर योग्य तो निकाल दिला जाईल. - विनोद मळाळे, माहिती परीक्षा विभागाचे जनसंपर्क अधिकारी आणि उपकुलसचिव.