Join us

नऊ विभागांत कोरोनाच्या एकूण बळींपैकी ५० टक्के मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:05 AM

दादर, शिवाजी पार्क, माहिममध्ये ६४० बळीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ११ हजार रुग्णांनी जीव गमावला ...

दादर, शिवाजी पार्क, माहिममध्ये ६४० बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत ११ हजार रुग्णांनी जीव गमावला आहे, त्यातील ५० टक्के मृत्यू मुंबईच्या नऊ विभागांतील आहेत. त्यातही पश्चिम उपनगरातील काही परिसरात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेल्याचे समाेर आले. मुख्यत: अंधेरी, दहीसर, विलेपार्ले आणि जोगेश्वरीत कोरोनामुळे एकूण ७८९ मृत्यू झाले आहेत.

मुंबईच्या २४ प्रभागांपैकी एक असलेल्या पूर्व उपनगरातील एस विभागात एकूण मृत्यूंपैकी आठ टक्के मृत्यूंची नोंद झाली. यात विक्रोळी, भांडुप, पवई या परिसरांचा समावेश आहे. या परिसरात एकूण ६५६ मृत्यूंची नोंद झाली. कोरोनाच्या तीव्र संक्रमणाच्या काळात सर्वाधिक रुग्ण असलेल्या जी उत्तर विभागात आतापर्यंत दादर, शिवाजी पार्क आणि माहिम परिसरात एकूण ६४० मृत्यू झाले.

याशिवाय, पी उत्तर - मालाड, आर मध्य - बोरीवली, एन - घाटकोपर, एल (कुर्ला), जी दक्षिण, के - पूर्व अंधेरी या विभागांत कोरोनामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. बोरीवली परिसरात कोरोनाच्या एकूण बळींपैकी सात टक्के मृत्यूंची नोंद झाली. कोरोनाच्या सर्वाधिक मृत्यूंत या विभागाचे स्थान पाचवे आहे.

* यंत्रणांनी कंबर कसली

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, अंधेरी विभागात सर्वाधिक मृत्यूंची नोंद होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ याच परिसरात आहे. आता शहर, उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात येण्यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे.

.......................................