पाच महिन्यांत नऊ टन ड्रग्ज जप्त; डीआरआयची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 04:47 AM2018-09-20T04:47:41+5:302018-09-20T04:49:01+5:30

महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)च्या रडारवर ड्रग्ज विक्रेते व ड्रग्ज उत्पादक आले आहेत

Nine tons of drugs seized in five months; DRI action | पाच महिन्यांत नऊ टन ड्रग्ज जप्त; डीआरआयची कारवाई

पाच महिन्यांत नऊ टन ड्रग्ज जप्त; डीआरआयची कारवाई

Next

मुंबई : महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)च्या रडारवर ड्रग्ज विक्रेते व ड्रग्ज उत्पादक आले आहेत. ड्रग्जविरोधात महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)ने विशेष मोहीम उघडली असून मे ते सप्टेंबर २०१८ या पाच महिन्यांत ९ हजार १२६ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. या ड्रग्जची किंमत ५१ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईअंतर्गत १४ जणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
गेल्या पाच महिन्यांत गांजा, कोकेन, ट्रेमॅडॉल, केटामाईन, मेटॅफेटामाईन, मेफेड्रॉन, आफ्रिकन खत, मेथॅक्वाॉईन यासारखे ड्रग्ज विभागाने जप्त केले आहेत. विभागाने केलेल्या प्रमुख कारवायांमध्ये १८ मे रोजी अडीच किलो फेन्सीक्लाईडीनच्या गोळ्या तर, २७ जूनला ३० कि लो मेथॅक्वॉलोन जप्त करण्यात आले. १३ जुलैला ४०० किलो आफ्रिकन खत जप्त करण्यात आले. ३ आॅगस्टला २५६ किलो केटामाईन जप्त करण्यात आले. तर, २४ जूनला ६ हजार ५४५ किलो व १४ सप्टेंबरला १ हजार ८८० किलो गांजा जप्त करण्यात आला. याचप्रमाणे छत्तीसगडमधील बस्तर व इतर नक्षलग्रस्त जिल्ह्यांत कारवाई करून गांजा जप्त करण्यात आला. मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये तसेच मुंबई व रायगड जिल्ह्यातील रसायनी भागात कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश व छत्तीसगड या चार राज्यांतील ड्रग्जमाफियांचे जाळे उद्ध्वस्त करून ड्रग्ज व्यापार संपुष्टात आणण्याचे ध्येय समोर ठेवून हे काम केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतात परदेशातून कोकेन या ड्रग्जची सर्वाधिक आयात होते. तर भारतातून निर्यात होणाऱ्या ड्रग्जमध्ये केटामाईन, अ‍ॅफॅड्रीन यासह इतर ड्रग्जचा समावेश आहे.
कोकेन हे ड्रग्ज दोन ग्रॅमपेक्षा जास्त सापडल्यास तसेच गांजा २० किलोपेक्षा जास्त सापडल्यास त्याचा व्यापारी हेतूने वापर होत असल्याचे ग्राह्य धरून गुन्हा दाखल केला जातो. यापेक्षा कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास खासगी वापर करण्याचा गुन्हा नोंदविण्यात येतो.

ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील
अतिरिक्त महासंचालक श्रवण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कार्यवाही सुरू आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई सापडून पिढी वाया जाण्याची भीती असल्याने आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही जास्तीतजास्त प्रयत्न करीत आहोत. नक्षलग्रस्त भागात कारवाई करताना जिवाला धोका असल्याने अतिशय गुप्तता पाळून आम्ही ही कारवाई करीत असतो.
- समीर वानखेडे, सह आयुक्त, महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय), मुंबई झोनल युनिट

Web Title: Nine tons of drugs seized in five months; DRI action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.