मुंबई : ल्युकेमियाग्रस्त नऊ वर्षीय मुलीने कोरोनावर मात केली आहे. कोरोना झाल्यामुळे निराश झालेल्यांमध्ये तिने कोरोनशी लढण्याची नवी उमेद जागवली आहे.
नाहूर येथील रहिवासी असेलली नऊ वर्षांची अंजली (बदललेले नाव) लॉकडाऊनमध्ये शाळेला अचानक सुट्टी मिळाल्याच्या आनंदात असतानाच तिला दोनदा ताप येऊन गेला. काही दिवसांनंतर तिचे गुडघे सुजत असल्याचे आणि ती लंगडू लागल्याचे पालकांच्या लक्षात आले. तिला स्थानिक आॅर्थोपेडिक डॉक्टरकडे नेण्यात आले.
पायांचा एक्स-रे काढला, मात्र रिपोर्टमध्ये दोष सापडला नाही. डॉक्टरांनी औषधे दिली, ती घेऊनही पाठ आणि पायाचे दुखणे कायम होते. गुडघ्यांवरची सूजही उतरली नाही. जवळपास आठ दिवसांनंतर, पालकांनी तिला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना तिला आर्थ्रायटिस असेल असा संशय व्यक्त करत उपचार सुरू केले; पण, फरक पडत नव्हता.
७ मे रोजी अंजलीला लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीअंती डॉक्टरांनी तिला ल्युकेमिया झाल्याचे सांगितले. तिथेच तिला दोन केमोथेरपी देण्यात आल्या. तोपर्यंत तिचे चालणे पूर्णपणे बंद झाले होते. तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. तिला कॅन्सर केअर विंगमध्ये हलविले. त्यानंतर केमोच्या पुढच्या उपचारावेळी केलेली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तिला हायब्रिड कोविड विभागात हलविले. कोविड आणि ल्युकेमिया अशा दोन्ही आजारांवरील उपचार एकाच वेळी सुरू झाले.
दरम्यान, पोलीस कर्मचारी असलेल्या वडिलांनाही कोरोना झाला. हिंमत न हरता ते आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले. दोघांवरही उपचार सुरू झाले. अंजलीच्या उपचारासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब योजनेतून पूर्णपणे आर्थिक सहाय्य करण्यात आले. दरम्यान, योग्य उपचारानंतर दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने २९ जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला.