Join us

अंधेरीत बंदुकीच्या धाकावर भरदिवसा सव्वानऊ लाखांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:16 AM

लुटारुंनी जाताना व्यवस्थापकाला कार्यालयातच कोंडून पळ काढला. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्ट्रीट क्राईमने डोकेवर काढल्याने पोलिसांच्या ताणात भर पडली. शनिवारी दोन लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवत एका व्यावसायिकाच्या कार्यालयातून भरदिवसा नऊ लाख २८ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. लुटारुंनी जाताना व्यवस्थापकाला कार्यालयातच कोंडून पळ काढला. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरी परिसरात राहणारे धर्मेंद्रकुमार पुरुषोत्तमभाई पटेल (४५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पटेल रमेश कुमार अंबालाल अ‍ॅण्ड कंपनी मध्ये पटेल हे गेली १२ वर्षापासून मॅनेजर म्हणून कामास आहे. या कंपनीचे मुंबईत भोईवाडा आणि अंधेरी परिसरात कार्यालय आहे. अशात नवीन कार्यालयासाठी मालकाने ११ लाख रुपये दिले. मात्र लॉकडाऊनमुळे भाडयाने जागा न मिळाल्याने त्यांनी, ते पैसे अंधेरीतील कार्यालयात ठेवले. त्यापैकी काही रक्कम कार्यालयीन कामकाजासाठी खर्च झाली. मात्र नऊ लाख २८ हजार रुपये कार्यालयाच्या तिजोरीत ठेवण्यात आले होते.शनिवारी सकाळी ११.३० वाजता नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करत असताना दोन तरुण कार्यालयात डोकावत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ते निघून गेले. मात्र पाऊण तासाने दोघेही पुन्हा कार्यालयात धडकले. त्यानंतर कार्यालयाला आतून लॉक करत, बंदुकीच्या धाकावर ‘भाई लोग का दो दिन से फोन नही उठा रहा है, तुम्हारे पास कितना पैसा है निकालो, नही तो यही ठोक दुंगा’, असे धमकावत त्यांनी पटेल यांच्याकडून त्यांनी पैसे काढून घेतले. तसेच त्यांचा मोबाइल आणि आॅफिसमधील सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर काढून घेतला. त्यानंतर बाहेरून दरवाजाला लॉक लावून दोघांनी पळ काढला.