कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांची शिक्षण विभागाकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, अनेक शहरे आणि ग्रामीण भागांतही शाळा सुरू ठेवता येतील की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने केली.
कोरोनामुळे राज्यातील प्रमुख शहरांत आणि ग्रामीण भागात ज्या ठिकाणी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, त्या ठिकाणी अद्यापही शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यात अद्यापही बहुसंख्य विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमच पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नसल्याचे सांगत असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी ज्या प्रकारे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण आहे. तेच धोरण नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना लागू करावे, अशी मागणी केली. तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करावा किंवा विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात ढकलावे, जेणेकरून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास ते लवकर सुरू करू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
.................