Join us

नववी पिढी सादर करणार सनईवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:35 AM

बडोदा येथे पार पडणा-या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध गायकवाड बंधूंची सनई आणि जलतरंगाची पर्वणी रसिकांना ऐकायला मिळणार आहे.

मुंबई : बडोदा येथे पार पडणा-या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध गायकवाड बंधूंची सनई आणि जलतरंगाची पर्वणी रसिकांना ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही स्वरूपाचे मानधन न स्वीकारता, केवळ सरस्वतीची सेवा करण्यासाठी हा योग जुळून येणार आहे. गायकवाड बंधूंची सनई वादनातील ही नववी पिढी आहे.९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ते सायंकाळी ४ दरम्यान ही मैफल रंगणार आहे. या मैफलीत दत्तात्रय गायकवाड हे जलतरंगाचे वादन करतील, त्यांचे धाकटे बंधू मुकुंद गायकवाड सनईवादन करणार आहेत. यांची साथ सुनील गायकवाड करणार असून, तबला श्रीराम गायकवाड, संबळ आलाप गायकवाड वाजविणार आहेत. ब-याच वर्षांनंतर साहित्य संमेलनात सनई वादनाचे सूर गुंजणार असून, साहित्य रसिकांसाठी ही अनोखी मेजवानी ठरणार आहे.गायकवाड यांचे आजोबा संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी पुण्याहून १९०४ साली बडोदे येथे बोलावून घेतले होते. सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात पं.वसईकर आणि जी.जी.गायकवाड यांना कलाकार म्हणून मानाचेआसन मिळाले होते. त्यामुळे गायकवाड यांच्या गायनाला ऐतिहासिक परंपरा आहे. याविषयी दत्तात्रय गायकवाड बंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, संमेलनात सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहोत. ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची बाब असून, आम्ही संमेलनात उत्स्फूर्त सादरीकरण करणार आहोत.>गायकवाड बंधंूची सनई वादनातील ही नववी पिढी आहे. विशेष म्हणजे कोणतेही मानधनते घेणार नाहीत.