मुंबई - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अखेर लंडनमध्ये फरार नीरव मोदीला आज अटक करण्यात आलं. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या येथील न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून ईडीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) कोर्टाने नीरवच्या ११ महागड्या कार आणि १७३ पेंटिग्ज लिलाव करण्यास परवानगी दिली आहे.
नीरव मोदीच्या मुंबईतील घरांवर छापे टाकून ईडीने मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. त्यात नीरव मोदीच्या बंगल्यामध्ये एम. एफ. हुसेन, के. के. हैब्बर, अमृता शेरगील यांच्यासारख्या नामांकित चित्रकारांच्या पेंटींग्जचे कलेक्शन मिळून आले होते. तसेच त्याच्या ११ कारही त्या ईडीने जप्त केल्या होत्या. त्यांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याची परवानगी ईडीने न्यायालयाकडे अर्जाद्वारे मागितली होती. पीएमएलए न्यायालयाने तो अर्ज मान्य करत प्राप्तिकर विभागाला लिलाव प्रक्रिया पार पाडून त्यातून जमा होणारे पैसे न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.