मुंबई – दिल्लीतील सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तिहार जेलमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास फासावर लटकवले, देशात बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची ही पहिलीच घटना आहे. या फाशीनंतर राजधानी दिल्लीत अनेकांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील निर्भयाला न्याय मिळाला अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी दिल्यानंतर अनेक स्तरातून याचं कौतुक आहे. बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विट करुन निर्भयातील दोषींना फाशी दिल्याचं समाधान व्यक्त केलं आहे. रितेश देशमुखने ट्विटमध्ये म्हटलंय की, माझी सद्भावना आणि प्रार्थना निर्भयाचे पालक, मित्रपरिवारासोबत आहे. दिर्घ काळ आपल्याला वाट पाहावी लागली परंतु न्याय मिळाला असं त्याने सांगितले.
तसेच कायद्याची अंमलबजावणी, कठोर न्याय आणि जलदगतीने न्यायालयाने केलेला निवाडा यापुढे अशा भयंकर कृत्य करणाऱ्या राक्षसांमध्ये भीती निर्माण करण्याचा एकमेव पर्याय आहे असं मत रितेश देखमुखने ट्विटमध्ये व्यक्त केलं.
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या वकिलांनी आपल्या अशिलांची फाशी वाचवण्यासाठी विविध कायदेशीर पर्यांय वापरून शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने आणि अखेरच्या क्षणी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. अखेरीस पहाटे साडेपाच वाजता ठराविक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फासावर लटकवले.
काय आहे प्रकरण?
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर सहा जणांनी सामुहिक बलात्कार करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर या तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. देशाच्या राजधानीत झालेल्या या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला होता. तसेच सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींविरोधात न्यायालयीन लढा सुरू झाला होता. त्यात एक आरोपी अल्पवयीन निघाल्याने त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती.