निर्भया पथकामुळे वाचले मुलीचे प्राण; रक्ताच्या थारोळ्यातून उचलून गाठले रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:16 PM2023-06-07T12:16:22+5:302023-06-07T12:16:50+5:30
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला उचलून तत्काळ रुग्णालयात नेल्यामुळे मुलगी थोडक्यात वाचली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धर्मशाळेत एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच खार पोलिसांच्या निर्भया पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला उचलून तत्काळ रुग्णालयात नेल्यामुळे मुलगी थोडक्यात वाचली. याप्रकरणी घटनेची नोंद करत, खार पोलिस अधिक तपास करत आहेत. मुलीचा जीव वाचविणाऱ्या पथकाचा कायदा व सुव्यस्थेचे पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सेठ इसरदास वरंदमल धर्मशाळेमध्ये एका मुलीने हाताला काहीतरी करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे एक १५ ते १६ वर्षांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिने हातावर सात ते आठ ठिकाणी कापले होते.
महिला पोलिस शिपाई निकिता म्हात्रे यांनी मुलीला उचलून पहिल्या मजल्यावरून खाली आणून चालतच १०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनमध्ये बसवून थेट भाभा रुग्णालयात दाखल केले. मुलीवर वेळीच उपचार सुरू झाल्याने तिचा प्राण वाचला. मुलीने हे पाऊल का उचलले याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
गावाला जाण्यास उशीर झाला म्हणून...
मुलगी राजस्थानची रहिवासी असून, गेल्या आठ दिवसांपासून कुटुंबीयांसोबत या धर्मशाळेत थांबली होती. ३ जून रोजी गावाला जाण्यास उशीर होत असल्याच्या रागात मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी दिली.