मुंबई – अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटलं आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचं चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर, गुजरातमधील दमन यादरम्यान ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली आहे.
अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारसह एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आलं आहे. या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमन याठिकाणी काही भागांवर मोठा परिणाम होणार आहे. एनडीआरएफने गुजरातमध्ये २ राखीव दलासह १३ टीम आणि महाराष्ट्रात ७ राखीव दलासह १६ टीम तैनात करण्यात आली आहेत. तर दीव-दमन, दादरा-नगरहवेली येथे एक-एक टीम तैनात केली आहे.
वादळाची तीव्रता लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्याच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात आणि पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा धोका आहे. मात्र या बदलांमुळे महाराष्ट्रात मुंबईसह किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी विशेषत: ३ व ४ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वादळ ताशी १३ किमी वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे़ मंगळवारी सकाळी त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे़ त्यानंतर ते बुधवारी दुपारी ते रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर आणि दमण दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
जूनमध्ये १२९ वषार्नंतर चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज
महाराष्ट्राच्या इतिहासात जूनमध्ये १२९ वर्षांनंतर चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर निर्माण होऊन धडकण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये १८९१ मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर १९४८, १९८० मध्ये अशाप्रकारे समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने चक्रीवादळ येईल अशी स्थितीही निर्माण झाली होती. मात्र, ती विरून गेली. यावेळी कमी दाबाचा पट्टा विरून जाणार की त्याचे वादळात रूपांतर होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
‘इंडिया’ नाव इतिहासजमा होणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; संपूर्ण देशाचं लक्ष
कोरोनावर ‘हे’ औषध अत्यंत प्रभावी असल्याचं सिद्ध; अनेक रुग्ण बरे झाल्याचं चित्र!
गुड न्यूज! ६५ लाख निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
सर्वसामान्यांना दिलासा द्या; 'आप'कडून उद्या राज्यभरात 'वीजबिल माफ करा' आंदोलन