Join us

आयपॅडचा वापर करणाऱ्या निशिकाने मिळविले ७३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:23 AM

बारावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मुंबई : बारावीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुंबईच्या सोफिया कॉलेजमधील निशिका होसनगडी या विद्यार्थिनीने पहिल्यांदाच आयपॅडचा वापर करत बारावीची परीक्षा दिली होती. निशिका डिस्टोनिया या एका दुर्मीळ आनुवंशिक आजाराने पीडित आहे. तिला बोलणे आणि हाताची हालचाल करणे यामध्ये त्रास होत असल्याने तिने आयपॅडचा पर्याय परीक्षा देण्यासाठी निवडला होता. मात्र या आजारावर आणि त्यामुळे येणाºया सर्व आव्हानांवर मात करत तिने ७३% गुण मिळवले आहेत.निशिका होसनगडी हिने सोफिया कॉलेजमधून कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली. निशिका आठ वर्षांची असताना आनुवंशिक आजारामुळे तिच्या बोलण्याची क्षमता हरवली आणि तिचे बोलणे बंद झाले. स्वरयंत्रामध्ये बिघाड झाल्याने तिची बोलण्याची क्षमता कमी झाली. तसेच तिचा उजव्या हाताची शक्ती कमी झाल्याने तो निकामी झाला. त्यामुळे तिला शिक्षणात अडचणी येत होत्या. परंतु निशिकाच्या आईवडिलांनी तिला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती नियमित शाळेतही जात होती. पण हळूहळू तिच्या हाताची हालचाल कमी झाली. त्यामुळे तिला शाळेत जाणे अवघड झाले. त्यामुळे निशिकाची आई तिला घरीच शिकवू लागली. २०१७ मध्ये निशिका एनआयओएस शाळेतून दहावी उत्तीर्ण झाली. त्या वेळी तिला आयपॅड वापरण्याची परवानगी दिली होती, असे निशिकाची आई रश्मी यांनी सांगितले. निशिकाला बारावीची परीक्षा देता यावी यासाठी निशिकाचे वडील नरेश हसनगडी यांनी बोर्डाकडे धाव घेत तिला पेपर लिहिण्यासाठी विशेष सवलत द्यावी अशी विनंती केली. तसेच तिला आयपॅडवर पेपर लिहिण्याची परवानगी मिळावी अशी विनंतीही केली. निशिका डाव्या हाताने कीबोर्डच्या माध्यमातून आयपॅडवर टाईप करू शकते. निशिकाची परिस्थिती लक्षात घेऊन तिने आयपॅडवर लिहिलेली उत्तरे उत्तरपत्रिकेमध्ये उतरविण्यासाठी लेखनिक देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यामुळे निशिकाला दिलासा मिळाला. निष्काला परवानगी देण्याबरोबरच बारावीमध्ये प्रथमच आयपॅडवरून परीक्षा देण्यात आली. लाला लजपतराय कॉलेजमध्ये तिला परीक्षेसाठी केंद्र आले होते.

टॅग्स :बारावी निकाल